डोंबिवली : डोंबिवली येथील पश्चिम भागातील कोपर भागातील शास्त्रीनगर रुग्णालया समोर एका दुकानात गस्तीवर असलेल्या एका ६० वर्षाच्या ज्येष्ठ रखवालदाराला याच भागातील एका दारुड्याने डोक्यात, अंगावर दगडी फेकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत रखवालदार गंभीर जखमी झाला आहे. विष्णुनगर पोलिसांनी तक्रार दाखल होताच आरोपीला सीसीटीव्ही चित्रणाच्या माध्यमातून तात्काळ अटक केली. गुरुवारी रात्री हा प्रकार घडला. हर्षद शाम कुशाळकर (२४, रा. सच्चिदानंद सोसायटी, सखाराम काॅम्पलेक्स, कोपर) असे दारुड्याचे नाव आहे.

मुन्नीराम सहानी (६०) असे जखमी रखवालदाराचे नाव आहे. दारुड्या हर्षद आणि रखवालदार सहानी हे एकाच संकुलात राहतात. पोलिसांनी सांगितले, रखवालदार मुन्नीराम हे पटेल आर मार्टच्या समोर शास्त्रीनगर रुग्णालया समोर कोपर रस्ता येथे गुरुवारी पहाटे तीन वाजताच्या दरम्यान गस्त घालत होते. ते दुकानाच्या बाहेर गस्तीवर होते. पाऊस आल्याने आडोसा म्हणून ते रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या बंदिस्त टेम्पोमध्ये जाऊन बसले. यावेळी तेथून आरोपी हर्षद दारू पिऊन चालला होता. त्याने मुन्नीराम यांना दारू पिण्यासाठी पैसे देण्याची मागणी केली. तसेच त्यांची खुर्ची बसण्यासाठी मागितली.

हेही वाचा >>> दिवा रेल्वे स्थानकात गृह फलाटाची उभारणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रखवालदार मुन्नीराम यांनी हर्षद दारु प्यायला असल्याने त्याला तेथून जाण्यास सांगितले. त्याचा राग हर्षदला आला. त्याने रस्त्यावरील मोठे दगड, पेव्हर ब्लाॅक उचलून ते मुन्नीराम यांच्या अंगावर फेकले. मोठा दगड डोक्यात मारुन त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. मुन्नीराम एकटेच असल्याने ते बचाव करू शकले नाहीत. मुन्नीराम यांचे नातेवाईक राजू सहानी यांनी याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी तात्काळ परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासून गुरुवारी पहाटेच आरोपी हर्षदला अटक केली.