ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक परिसरात एका प्रवाशाला लुटण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. प्रवासी घाबरल्याने त्याने ठाणे स्थानकातून पळ काढत एक्स्प्रेस गाडीने दादर रेल्वे स्थानक गाठले. तेथील रेल्वे सुरक्षा दलाला (आरपीएफ) घडलेला प्रकार सांगितला असता, ‘हमारे पास आनेका नहीं…तुम्हारा कम्प्लेन्ट बाहर देखो…’असा ‘सल्ला’ दिला. अखेर त्या प्रवाशाने दादर रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे.
संबंधित प्रवाशाने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, ते मुंबई येथील विक्रोळी भागात राहत असून ते व्यावसायिक आहेत. ८ ऑगस्टला ते कामानिमित्ताने मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानकात उतरले होते. मुंबई दिशेकडील पादचारी पुलावरून जात असताना, दोन लहान मुले त्यांच्याजवळ येऊन पैसे मागू लागली. त्यानंतर आणखी चार ते पाच लहान मुले, एक महिला आणि पुरुष तेथे आले. त्यांच्या खिशातील मोबाईल ते काढून घेण्याचा प्रयत्न करु लागले. त्यामुळे घाबरलेला प्रवासी फलाट क्रमांक तीन वर आला. त्यावेळी दोन तरुण तेथे आले. त्यांनी त्या प्रवाशाला शिवीगाळ करत धमकाविण्यास सुरुवात केली. प्रवाशाने तेथून पळ काढत फलाट क्रमांक ६ गाठले. त्यानंतर त्यांनी तात्काळ मुंबई दिशेकडे जाणाऱ्या कोणार्क एक्स्प्रेस या रेल्वेगाडीत प्रवेश करत मोबाईलद्वारे पोलिसांना संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला.
प्रवासी दादर रेल्वे स्थानकात उतरला. त्यावेळी तेथील फलाट क्रमांक १२ वर रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) कर्मचारी तैनात होते. प्रवाशाने त्यांच्याकडून मदत मागितली असता, ‘हमारे पास आनेका नहीं…तुम्हारा कम्प्लेन्ट बाहर देखो…’ असे ते कर्मचारी त्यांना म्हणाले. त्यानंतर प्रवासी दादर रेल्वे स्थानकाबाहेर पडले. त्यांनी एक्स्प्रेस रेल्वेगाडीत असताना पोलिसांना संपर्क साधला होता. तेथील पोलिसांनी त्या प्रवाशाला संपर्क साधून दादर रेल्वे स्थानकाबाहेरील लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास सांगितली. त्यानंतर प्रवाशाने दादर लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे दादर लोहमार्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ चे कलम ३०३ (२), ३५२, ६२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला. हा प्रकार ठाणे रेल्वे स्थानकात घडल्याने ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.
माझ्यासारख्या स्थानिक मुंबईंकरासोबत….
– या तक्रारीत तक्रारदाराने म्हटले आहे की, माझ्यासारख्या स्थानिक मुंबईकराला अशा घटनेचा सामना करावा लागत असेल तर, राज्यातील विविध जिल्ह्यातून येणाऱ्या इतर सामान्य प्रवाशांसोबतही अशी घटना भविष्यात घडू शकते त्यामुळे तक्रार नोंदविली.