ठाणे : जुन्या ठाण्यातील अधिकृत धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची नियमावली आमच्या सरकारच्या काळात तयार झाली. ही संपूर्ण प्रक्रिया भाजप सरकारने पूर्ण केली. असे असताना सध्याच्या काळात जी कामे केली नाहीत त्याचेही श्रेय घेण्याची सवय काहींना लागली आहे,  अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी ठाण्यात शिवसेनेवर हल्लाबोल केला.

 ठाण्यातील दिव्यांगस्नेही उद्यान, कै. वसंतराव डावखरे प्रेक्षक गॅलरीसह विकासकामांचे फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार विनय सहस्रबुद्धे, आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे उपस्थित होते.

जुन्या ठाण्याच्या पुनर्विकासासाठी भाजप आमदार संजय केळकर यांनीच पाठपुरावा केला होता. त्या रहिवाशांना न्याय देण्यासाठी माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात नियमांना मंजुरी देण्यात आली. मात्र त्याची अंमलबजावणी आणि घोषणा होण्यास वर्षभराचा कालावधी लागला. या कामाचे श्रेय घेण्यासाठीच अंमलबजावणी रखडवली होती का, असा सवाल फडणवीस यांनी शिवसेनेला केला.

 कल्याणच्या दुर्गाडी पुलासह विविध कामांमध्ये भाजपचे असलेले श्रेय खेचून घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांनी दुर्गाडी पुलाच्या कामाला मंजुरी देत निधी दिला होता. त्यामुळे या कामाचे श्रेय भाजप सरकारचे आहे, असे सांगत आता ठाणे आणि कल्याण शहरात आपण केलेल्या कामाचे श्रेय ओरडून सांगण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले. तर, कोपरी पुलाच्या कामाचे श्रेय  फडणवीस यांनाच जाते, असे  संजय केळकर यांनी स्पष्ट केले. 

अन्यायाविरोधात संघर्ष गरजेचा

मुघलांची मनसबदारी व चाकरी करीत असलेल्या समाजात छत्रपती शिवाजी महाराजांनी पौरुष निर्माण केले होते. आताच्या समाजात ते पौरुष पुन्हा निर्माण करण्याची गरज आहे. छत्रपती शिवरायांच्या रक्तातील अंश प्रत्येक व्यक्तीत असून, प्रत्येकाने अन्यायाविरोधात लढण्यासाठी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन  फडणवीस यांनी सकल मराठा समाजातर्फे आयोजित कार्यक्रमात केले.