लोकसत्ता प्रतिनिधी

बदलापूरः राज्यासह ठाणे जिल्ह्यातही मंगळवारी उष्णतेची लाट जाणवली. जिल्ह्यातील जवळपास सर्वच शहरांमध्ये तापमानाने सलग दुसऱ्या दिवशी चाळीशी ओलांडली होती. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात सर्वाधिक ४३.७ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. त्याखालोखाल भिवंडी, बदलापूर, मुंब्रा या शहरांमध्येही ४२ अंश सेल्सियस तापमान होते. तर ठाणे, कल्याण, डोंबिवली, कळवा या शहरांमध्येही पारा इतक्या अंशांपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे नागरिकांना उन्हाचे चटके जाणवले.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यासह ठाणे जिल्ह्यात तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला होता. त्यानुसार सकाळपासूनच जिल्ह्यात उन्हाच्या झळा बसू लागल्या होत्या. सकाळी दहा वाजल्यापासूनच सुर्य आग ओकत असल्याचा भास होत होता. दुपारी एक नंतर तापमानात वाढ झाली. दुपारी दोन वाजेपर्यंत ठाणे जिल्ह्यातील सर्वच शहरांमध्ये तापमानाच्या पाऱ्याने ४२ अंश सेल्सियस गाठले होते. त्यात जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात खासगी हवामान अभ्यासकांनी सर्वाधिक ४३.७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद केली. तर त्या खालोखाल बदलापूर, मुंब्रा, ठाणे, कल्याण,डोंबिवली, भिवंडी शहरातही पारा ४२ अंश सेल्सियस पार गेला होता.

आणखी वाचा-कल्याण-डोंबिवली, तळोजा, उल्हासनगरचा पाणी पुरवठा चोवीस तास बंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी बदलापुरात आपल्या हवामान केंद्रात ४३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद केली. तर मुंब्रा आणि भिवंडी येथे ४३.२, कल्याण येथे ४३.१, डोंबिवली येथे ४३, कळवा येथे ४२.८ तर ठाणे शहरात ४२.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याची माहिती मोडक यांनी दिली आहे. मंगळवारी नोंदवले गेलेले तापमान वर्षीचे सर्वाधिक तापमान असल्याचे मोडक यांनी सांगितले आहे. उन्हाचा पारा इतका होता की दुपारच्या सुमारास घरातील पंखे आणि वातानुकूलित यंत्रणा ही निष्प्रभ वाटत होती. बाहेर पडणारे नागरिक टोपी आणि स्कार्फचा वापर करत होते. तर शीतपयांकडे अनेकांनी आपला मोर्चा वळवला होता.