बदलापूरः भारत पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत भारतातील विविध शासकीय संस्था, कार्यालये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संकेतस्थळांवर तब्बल १५ लाख सायबर हल्ले झाल्याचे समोर आले होते. यात ठाणे जिल्ह्यातील कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाचाही समावेश असल्याची कबूल राज्याच्या सायबर गुन्हे विभागाने दिली आहे. त्यामुळे सध्या पालिकेचे संकेतस्थळ बंद ठेवण्यात आले आहे. पालिका प्रशासनाने संकेतस्थळावरील माहिती सुरक्षीत असल्याची माहिती दिली आहे.
पहलगाम हल्ल्याच्या नंतर पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर भारताच्या वतीने हल्ले करण्यात आले. त्या युद्धकाळात समाज माध्यमे, माध्यमे आणि इतर माध्यमातूनही वेगळ्या प्रकारचे युद्ध छेडले जात होते. यात सायबर हल्ल्याचाही समावेश होता. या काळात भारतातील विविध शासकीय संस्था, कार्यालये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संकेतस्थळावरही सायबर हल्ले करण्यात आले. या काळात तब्बल १५ लाख सायबर हल्ले झाल्याची माहिती पुढे आहे. यात पाकिस्तानासह बांगलादेश, इंडोनेशिया या भागातून हे हल्ले झाले. दोन्ही देशांचे शस्त्रसंधीवर एकमत झाल्यानंतर या हल्ल्यांचे प्रमाण घटले. मात्र तोपर्यंत अनेक संकेतस्थळे हॅक झाली होती.
या एकूण हल्ल्यात सुमारे १५० हल्ले यशस्वी झाले. यात ठाणे जिल्ह्यातील कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या संकेतस्थळावर झालेला हल्लाही यशस्वी झाला होता. कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी लोकसत्ताशी बोलताना या हल्ल्याची कबुली दिली. मात्र संकेतस्थळावर असलेली सर्व माहिती सुरक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. सध्या खबरदारीचा उपाय म्हणून संकेतस्थळ बंद ठेवण्यात आले आहे, असेही मारूती गायकवाड यांनी सांगितले. त्याचवेळी सायबर हल्ल्यावेळी पहिले मुखपृष्ठ विद्रुपीकरणाचा प्रयत्न झाला अशीही माहिती समोर आली आहे. सध्या तज्ज्ञांच्या मदतीने संकेतस्थळ दुरूस्तीचे काम केले जाते आहे.
सायबर हल्ल्यावेळी काही चुकीची माहिती, बातम्या, फोटो संकेतस्थळावरर टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. मात्र त्याची माहिती मिळताच तात्काळ संकेतस्थळ बंद करण्यात आले होते. त्यामुळे चुकीची माहिती प्रसारीत होण्यापासून रोखले गेले. परिणामी सायबर हल्ल्याचा हेतू साध्य होऊ शकला नाही, अशीही माहिती समोर आली आहे. बदलापूर आणि अंबरनाथ शहराच्या आसपास संरक्षण दलाच्या आणि देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने दोन महत्वाची आस्थापने आहेत. मात्र या काळात या आस्थापना, त्यांचे संकेतस्थळ यांच्यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला झाला नसल्याचेही समोर आले आहे.