बदलापूर : एटीएम कार्डची अदलाबदल करून एका महिलेच्या बँक खात्यातून तब्बल ३६ हजार रुपये काढून घेतल्याची धक्कादायक घटना बदलापूर पूर्व भागात घडली आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेने पोलिसांत धाव घेतली असून बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या होत्या. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येते आहे.

बदलापूर पूर्वेत राहणाऱ्या या गृहिणीने याबाबत तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गुरुवारी संध्याकाळी सुमारे सात वाजता त्या घोरपडे चौक, कात्रप येथील बँक ऑफ बडोदा शाखेच्या एटीएममध्ये गेल्या होत्या. तेथे आधीच दोन अनोळखी व्यक्ती थांबलेल्या होत्या. यातील एकाने बाहेर उभे राहून लक्ष ठेवले तर दुसऱ्याने एटीएम मशीनजवळ मदत करण्याच्या बहाण्याने फिर्यादींचा विश्वास संपादन केला. पावती न काढल्यास दीडशे रुपये कट होतील असे सांगून त्यांनी फिर्यादींना पुन्हा कार्ड टाकायला भाग पाडले. त्या वेळी त्यांनी एटीएम पिन नंबरही पाहून घेतला. यानंतर एटीएम कार्ड बाहेर काढताना फिर्यादींना त्यांच्या कार्डाऐवजी दुसऱ्याचे कार्ड देऊन अदलाबदल करण्यात आली. मात्र, हा प्रकार लक्षात येण्याआधीच फसवणूक करणाऱ्यांनी बबीता घुले यांच्या खात्यातून ३६ हजार रुपये काढून घेतले.

या प्रकारानंतर त्यांनी बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून अनोळखी आरोपींचा शोध सुरू केला आहे. शहरात यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या असून एटीएममधील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

नागरिकांनी घ्यावयाची काळजी

  • एटीएममध्ये कधीही अनोळखी व्यक्तींची मदत घेऊ नये.
  • कार्ड बाहेर आल्यानंतर कार्डाचे नाव नीट तपासून पाहावे.
  • जर एटीएममध्ये संशयास्पद व्यक्ती आढळल्या, तर त्वरित बाहेर पडून दुसऱ्या एटीएममध्ये जावे.
  • संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे.
  • एटीएम पिन नंबर टाकताना कीपॅड झाकून टाकावा.
  • बँक खात्यातील व्यवहारांवर नियमित लक्ष ठेवावे आणि अनधिकृत व्यवहार त्वरित बँक व पोलिसांना कळवावेत.

पोलिसांचे नागरिकांना आवाहन

या घटनेनंतर बदलापूर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. एटीएम व्यवहार करताना शक्यतो एकटे जाऊनच व्यवहार करावेत. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या बोलण्याला भुलू नये आणि आपल्या कार्ड वा पिन नंबरची माहिती इतरांना देऊ नये. एटीएम फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.