बदलापूर : गेल्या काही महिन्यांपासून गंभीर वीज समस्येला सामोरे जाणाऱ्या बदलापुरकरांच्या भविष्यातील वीज समस्येवर लवकरच पर्याय उपलब्ध होणार असून टाटा कंपनीच्या माध्यमातून बदलापूर शहराला वीज पुरवली जाणार आहे. टाटा पावर कंपनीच्या माध्यमातून १८० मेगाव्हॅट वीज पुरवण्यासाठी उपकेंद्राची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी आगाऊ जागेची मागणी कंपनीने नोंदवली असून अटी शर्थींच्या अधीन राहून जागा ताब्यात घेण्यासाठी कंपनीने कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाकडे त्यासाठीचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे शहराला येत्या काळात अतिरिक्त वीज उपलब्ध होईल.

बदलापूर शहरात गेल्या काही वर्षात झपाट्याने लोकसंख्या वाढली. वाढत्या लोकसंख्येला पुरवण्यासाठी वीज आणि यंत्रणा अपुरी पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात शहरातील वीज प्रश्न गंभीर बनला आहे. सातत्याने खंडीत होणारा वीज पुरवठा, देखभाल दुरूस्तीसाठी लागणारा वेळ, त्याचा ग्राहकांवर होणारा परिणाम आणि वाढणारा संताप गेल्या काही दिवसात प्रकर्षाने जाणवला.

वाढती लोकसंख्या आणि वीजेची मागणी यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात चक्राकार पद्धतीने वीज बंद करून भार व्यवस्थापनाचा प्रयत्न केला जातो. यावर तोडगा म्हणून काही महिन्यांपूर्वी स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी शहराला टाटा कंपनीकडून पर्यायी वीज व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानंतर टाटा पावर कंपनीनेही त्यावर सकारात्मक पाऊले उचलली. त्यानंतर या प्रकल्पासाठी टाटा कंपनीला जागेची आवश्यकता होती. कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून क्रीडा संकुलासाठी आरक्षित असलेल्या आरक्षण क्रमांक १८ च्या सर्वेक्षण क्रमांक ४८ आणि ४९ भुखंडांवरील ३.७० एकर जागा देण्याची तयारी दर्शवली. सध्या त्याच्या वापर बदलाचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आला आहे.

असा असेल प्रकल्प

टाटा पावर कंपनीने या प्रकल्पाच्या उभारणीसाठी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. टाटा कंपनीकडून कुळगाव बदलापूर नगरपालिकेला या प्रकल्पातील उपक्रेंद्रांच्या उभारणीसाठी आगाऊ जागेची मागणी केली आहे. अटी शर्थींच्या अधीन राहून जागेचा ताबा दिल्यास प्रकल्पाला गती मिळेल अशी आशा टाटा कंपनीने व्यक्त केली आहे. टाटा पावर कंपनी येथे ९०-९० मेगाव्हॅट क्षमतेचे दोन उपकेंद्र उभारेल. खरवईत ४, कात्रपमध्ये २ तर शिरगाव आणि पोद्दार प्रकल्पात प्रत्येकी एक फीडरच्या माध्यमातून ही वीज महावितरणाला देण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने पूर्णत्वास गेल्यास शहराला अतिरिक्त १८० मेगा व्हॅट वीज उपलब्ध होणार असल्याची माहिती टाटा पावर कंपनीच्या प्रतिनिधींनी दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रतिक्रियाः सध्या बदलापूर शहराला १०० मेगाव्हॅट वीजेची मागणी आहे. टाटा पावर उपक्रेंद्र झाल्यास सुमारे १८० मेगाव्हॅट वीज मिळू शकते. ग्राहकांना महावितरणाच्या माध्यमातून ही वीज मिळेल. वाढत्या मागणीला याचा फायदा होईल. – आनंद काटकर, कार्यकारी अभियंता, महावितरण, बदलापूर.