बदलापूर: वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही वन्यजीव सप्ताह २०२५ राज्यभर साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात एक आगळावेगळा आणि उपयुक्त उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘गिधाड घरटे शोधमोहीम स्पर्धा’ या मोहिमेअंतर्गत नागरिकांना ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत सध्या वापरात असलेले गिधाडाचे घरटे शोधून दाखवायचे आहे. असे घरटे ओळखून स्थानिक वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दाखवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला २ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे.
हा उपक्रम वनविभाग, महाराष्ट्र राज्य, इंटॅक ठाणे चॅप्टर आणि अश्वमेध प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला असून, या संपूर्ण मोहिमेस सीस्केप, महाड यांचे सहकार्य लाभले आहे.
गेल्या दोन दशकांत गिधाडांच्या संख्येत झालेली चिंताजनक घट ही केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात चर्चेचा आणि काळजीचा विषय ठरली आहे. विषारी औषधांचा वापर, निवासस्थानांची कमतरता आणि पर्यावरणीय असमतोल या कारणांमुळे गिधाडे जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर पोहोचली आहेत. अशा परिस्थितीत गिधाडांचे अस्तित्व ओळखणे, त्यांची घरटी शोधणे आणि त्यांचे रक्षण करणे हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक नागरिकांनी आपल्या परिसरात दिसणारे गिधाडांचे घरटे शोधून त्याची माहिती संबंधित वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना द्यावी. फक्त ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत असलेले आणि सध्या गिधाड वापरत असलेले घरटेच बक्षिसासाठी पात्र ठरणार आहेत. ठाणे जिल्हा हा पूर्वी गिधाडांच्या हक्काच्या वास्तव्याचा भाग होता. कालांतराने नागरीकरण, जंगलात खाद्याचा तुटवडा या कारणांमुळे त्यांची संख्या हळूहळू घटत गेली. यापूर्वी २०२२ वर्षात माहुली किल्ल्याच्या परिसरात गिधाडांचे शेवटचे वास्तव्य नोंदवले गेले होते. आता तीन वर्षात गिधाडांचे घरटे आढळून आलेले नाही, अशी माहिती मानद वन्यजीव संरक्षक अविनाश हरड यांनी दिली आहे. आकाशात अनेकदा ही गिधाडे उडताना दिसतात मात्र ती ठाणे जिल्ह्यात वास्तव्यास नाहीत. नाशिक जिल्ह्यात यांची संख्या मोठी आहे. एक गिधाड साधारणत दिवसभरात १०० किलोमीटर परिसरात प्रवास करत असते. त्यामुळे ते ठाणे जिल्ह्यात येतात, असेही हरड सांगतात.
गिधाड उपहारगृह व्हावे
मेलेली जनावरे दूर जंगलात नेऊन टाकली जातात. त्याकडे गिधाडे आकर्षित होतात. त्यानंतर त्यांची संख्या वाढते. असे सध्या ठाणे जिल्ह्यात होत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी लढा वल्चर रेस्टॉरंट अर्थात गिधाड उपहारगृह तयार करण्याची गरज आहे. त्यासाठी पाऊले उचलण्याची गरज आहे, असे मत अविनाश हरड यांनी व्यक्त केले आहे.