बदलापूरः अपघातग्रस्त व्यक्तीवर उपचार करताना केलेल्या निष्काळजीपणामुळे संबंधित व्यक्तीला आपला जीव मगवावा लागला. याविरूद्ध सुरू असलेल्या चौकशीत उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि रूग्णालयावर कारवाई करण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य सहसंचालकांनी दिले आहेत. बदलापुरातील सह्याद्री आणि धनलक्ष्मी असे या रूग्णालयांचे नाव असून मालक डॉ. योगेश मिंढे आणि डॉ. विकास कांबळे यांच्या रूग्णालयाचा परवाना रद्द करत त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सकांना देण्यात आले आहेत.

शासकीय आरोग्य व्यवस्था बळकट नसल्याने बदलापुरसारख्या शहरात खासगी रूग्णालयांवर आपातकालीन परिस्थितीत अवलंबून राहावे लागते. मात्र काही खासगी रूग्णालयांमधील बेजबाबदार कारभारामुळे रूग्ण जीवाला मुकत असल्याचे समोर आले आहे. २८ नोव्हेंबर २०२४ रोजी बदलापुरात एक ३४ वर्षीय तरूणाचा अपघात झाला. त्यानंतर त्या तरूणाला सह्याद्री रूग्णालयाच उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी रूग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे रूग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी कुटुंबियांसह पाठपुरावा करणाऱ्या निर्भया सामाजिक संघटनेच्या अध्यक्षा संगिता चेंदवणकर आणि दयावान संघटनेचे अविनाश सोनावणे यांनी याची तक्रार आरोग्य संचालकांकडे तक्रार केली होती.

रूग्णालयात डॉक्टर नसताना चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया सुरू केल्याने रूग्णालाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काही वेळाने शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर आले. मात्र त्यापूर्वीच रूग्ण दगावला होता, अशी माहिती संगिता चेंदवणकर यांनी दिली. रूग्ण दाखल केला तेव्हा त्याच्या फक्त डोळ्याला जखम होती. चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया केल्याची बाब शवविच्छेदन अहवालातही समोर आली आहे. हीच बाब आम्ही मांडली होती. त्यानुसार आरोग्य सहसंचालकांनी ठाणे जिल्हा शल्य चिकित्सकांना सह्याद्री रूग्णालय आणि धनलक्ष्मी रूग्णालयाचे मालक डॉ. योगेश मिंढे आणि डॉ. विकास कांबळे यांच्या रूग्णालयाचा परवाना रद्द करून दोन्ही डॉक्टरांवर फौजदारी कारवाई करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, असेही चेंदवणकर यांनी सांगितले आहे. मात्र अजुनही या रूग्णालयांवर कारवाई झाली नसल्याने कुटुंबियांनी आणि याचा पाठपुरावा करणाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चौकशी समितीची शिफारस

याप्रकरणी तक्रारीनंतर एका चौकशी समितीची स्थापना करण्यात आली होती. त्या समितीने अनेक जणांचे जबाब नोंदवले होते. त्या अंती आलेल्या निरिक्षणावरून सविस्तर अहवाल तयार करण्यात आला होता. त्या अहवालानुसार राज्य आरोग्य सहसंचालिका डॉय निला गोल्हाईत यांनी रूग्णालय बंद करून डॉक्टरांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक कैलास पवार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

रूग्णांच्या जीवांशी खेळणाऱ्या डॉक्टराविरूद्ध आणि बोगस डॉक्टरांविरूद्द कठोर कारवाईची गरज आहे. याप्रकरणी वेळेत कारवाई न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करणार. – संगिता चेंदवणकर, अध्यक्षा, निर्भया सामाजिक संघटना.