कुळगाव-बदलापूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी सज्ज झाली असून पुढील सर्व प्रक्रिया निर्दोष व सक्षमपणे राबविण्यासाठी विशेष आराखडा तयार करण्याचा निर्णय नगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून अंबरनाथ आणि बदलापूरात असंख्य चुका आढळून आल्या आहेत. प्रभाग आरक्षणाची सोडत तसेच प्रारूप मतदार याद्यांमधील नावांमध्येही सावळागोंधळ दिसून आला आहे. येत्या काळात या चुका टाळून ठोसपणे पुढील प्रक्रिया मार्गी लावण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून पुढील दोन दिवसात मतदार जागृती अभियान राबविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
प्रभाग आरक्षण सोडत व प्रारूप मतदार याद्यांमध्ये प्रशासनाकडून अक्षम्य चुका झाल्या होत्या. त्यामुळे इथून पुढील प्रक्रिया निर्दोष पार पाडण्यासाठी नगरपालिकेने कंबर कसली आहे. पुढील बहुतांश कामे ही ऑनलाइन पद्धतीने पार पाडण्यात येणार आहेत. उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरण्याचा निर्णय झाल्याने नगरपालिकेने उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरणे सोपे जावे या हेतूने आठ मदत केंद्रांची स्थापना केली आहे. या मदत केंद्रांवर उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. याशिवाय या अर्जासोबतची कागदपत्रे स्कॅन करून जोडण्यासाठी चार वेगळी मदत केंद्रे नगरपालिकेने सुरू केली आहेत. उमेदवारांना स्वतंत्रपणे ऑनलाइन अर्ज भरावयाचा असल्यास ते kbmc.gov.in या नगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन उमेदवारी अर्ज भरू शकतात. याच संकेतस्थळावर मतदारांना त्यांचे नाव कोणत्या प्रभागात तसेच कोणत्या क्रमांकाच्या यादीत आहे, हेदेखील पाहता येईल. मतदारांना नावे शोधण्यास मदत व्हावी यासाठी नगरपालिकेने दुबे रुग्णालय येथे मतदार सहाय्यता केंद्र उभे केले असून येथे मतदारांना त्यांचे याद्यांमधील नाव तपासता येणार आहे. मतदानासाठी मतदार केंद्र नेमण्याचे काम सुरू असून सरासरी १३३ मतदान केंद्रे बदलापूर येथे असतील. त्यासाठी १६० ईव्हीएम मशीन लागू शकतील. परंतु हा आकडा बदलूदेखील शकतो, अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी देवीदास पवार यांनी दिली.
दरम्यान, निवडणुकीसाठी जनजागृती म्हणून नगरपालिकेमार्फत संपूर्ण शहरातील चौका-चौकांत मतदानाचा हक्क बजावा, असे फलक लावण्यात आले आहेत. तसेच पालिकेमार्फत प्रमुख ठिकाणी मतदारांना जागृत करण्यासाठी पथनाटय़ांचे सादरीकरण करण्यात येणार असून लोकल केबल चॅनलवर मतदारानीं मतदान करावे यासाठी जाहिरात देण्यात येणार आहे. यावेळी पहिल्यांदाच सोशल मीडिया व एसएमएसच्या माध्यमातूनदेखील मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे. मतदारांच्या स्लिपांचे वाटप पालिकेमार्फतच करण्यात येणार आहे.
दीड लाख मतदार
२०११ च्या जनगणनेनुसार, बदलापूर पालिकेतील नागरिकांची लोकसंख्या ही १,७४,२२६ इतकी असली तरी, पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत यंदा १,५२,०७९ मतदारांची नोंदणी झाली आहे. यात पुरुषांचा टक्का जास्त असून ८२,२३४ पुरुष आहेत तर, महिलांची संख्या ६९, ८३८ इतकी आहे, तर ७ इतरांचा समावेश आहे.