बदलापूर : बदलापुरात पालिका निवडणुकीवरून शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये तुंबळ शाब्दिक युद्ध सुरू असतानाच शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी भाजपचे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची भेट घेतली आहे. त्यांनी समाजमाध्यमावर याबाबत माहिती दिली आहे. शहरात एकीकडे भाजपा आणि शिवसेनेतील संघर्ष टोकाला पोहोचलेला असताना म्हात्रे यांनी पाटील यांच्या भेटीकडे अनेक अर्थांनी पाहिले जाते.
राज्यात निवडणुकीचे वारे वाहत असून येत्या काही दिवसात नगरपालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रातही वातावरण तापू लागले आहे. बदलापूर शहरात महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपात थेट लढत होणार आहे. शहरात दोन्ही पक्ष ताकदवान आहेत. दहा वर्षांपूर्वी झालेल्या पालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपात थेट लढत झाली होती. त्यानंतर शिवसेनेने बहुमत मिळवले होते. तर भाजप विरोधी पक्षात होता. मात्र त्यानंतर शिवसेनेला थेट जनाधार तपासण्यासाठी निवडणूक लढता आलेली नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला भाजपसाठी काम करावे लागले. त्यामुळे भाजपची ताकदही मोठी वाढली आहे. गेल्या वर्षात झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार किसन कथोरे हे मोठ्या फरकाने विजयी झाले. त्यानंतर भाजपने शिवसेनेला थेट आव्हान दिले आहे. तर शिवसेना आणि भाजपाच्या प्रमुख नेत्यांमध्ये मोठा संघर्षही पाहायला मिळतो आहे.
म्हात्रेंकडून पाटील यांच्यावर स्तुतिसुमने
शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि आमदार किसन कथोरे यांच्यात थेट आव्हान प्रतिआव्हान दिले जाते आहे. शहरात शिवसेना भाजपतील संबंध कमालीचे बिघडलेले असतानाच शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी भाजपचे माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची भेट घेतली आहे. त्याची माहिती त्यांनी आपल्या समाज माध्यमातून दिली आहे. यावेळी फक्त शुभेच्छा नाही तर शहरातील विविध विकासकामांवर चर्चा झाल्याचेही म्हात्रे यांनी नमूद केले आहे. एरवी भाजपला कोणत्याही विकासकामांचे श्रेय देण्यास विरोध करणारे म्हात्रे यांनी पाटील यांच्या कुशल नेतृत्व आणि दूरदृष्टीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. शहरातील रस्ते, सांडपाणी, पाणीपुरवठा आणि शिक्षण यासारख्या क्षेत्रात पाटील यांच्यामुळे गती मिळाल्याचा उल्लेखही म्हात्रे यांनी केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पाटील आणि कथोरे संघर्षाचा इतिहास
कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांच्यातील संघर्षाचा इतिहास आहे. आमदार किसन कथोरे यांच्यामुळे आपला पराभव झाला असे पाटील यांनी अनेकदा म्हटले आहे. तर विधानसभा निवडणुकीत पाटील यांनी किसन कथोरे यांना मदत केली नव्हती. त्यामुळे हा संघर्ष स्थानिक पालिका निवडणुकीत कोणत्या टोकाला जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पाटील यांचे समर्थक पालिकेत कुणाच्या बाजूने कौल देतात हेही निकाल ठरवण्यास महत्वाचे ठरणार आहे.
काय म्हणाले म्हात्रे…
केंद्रीय राज्यमंत्री तसेच भिवंडी लोकसभेचे मा. खासदार श्री. कपिलजी पाटील यांची दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्या सोबत बदलापूर शहरातील आणि परिसरातील विविध विकासकामांवर चर्चा झाली. कपिलजींच्या कुशल नेतृत्वाखाली आणि दूरदृष्टीमुळे कुळगाव-बदलापूर शहरात रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, शिक्षण आणि सार्वजनिक सुविधा अशा अनेक महत्त्वपूर्ण विकासकामांना गती मिळाली आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून नेहमीच जनतेच्या अडचणी सोडवण्याला आणि नव्या योजनांना चालना देण्याला प्राधान्य दिलं आहे. दिवाळीच्या या शुभ पर्वावर त्यांना आणि त्यांच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा व उत्तम आरोग्य, दीर्घायुष्याच्या सदिच्छा.
