बदलापूरः बदलापुरातून मुरबाडकडे जाणाऱ्या मार्गावरचा यंदाचा प्रवासही खड्ड्यातूनच करावा लागणार आहे. बदलापुरातून वालिवली, एरंजाडमार्गे बारवी धरणाला जाणाऱ्या मुरबाड रस्त्यावर या वर्षीही मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागते आहे. एमआयडीसी प्रशासनाने गेल्या वर्षात या रस्त्यासाठी निविदा जाहीर केली होती. मात्र ऐनवेळी कंत्राटदाराने कामास नकार दिल्याने निविदा प्रक्रिया पुन्हा राहवण्याची वेळ एमआयडीसीवर आली आहे.

मुरबाड आणि अहमदनगर महामार्गाला जोडण्यासाठी महत्वाचा असलेल्या बारवी रस्त्याची यंदा पुन्हा एकदा दुरावस्था झाली आहे. अंबरनाथ, बदलापुरातून प्रवासी या रस्त्याचा वापर करत असतात. बदलापूर शहाच्या प्रवेशद्वारापासून डावीकडे वळण घेणाऱ्या या रस्त्यावर सुरूवातीपासूनच खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. वडवली, वालिवली, एरंजाड या बदलापूर नगरपालिकेतील गावांमधून जाणाऱ्या या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. बदलापुरातून बाहेर पडताना वालिवली चौकापासून मोठ्या खड्ड्यांना सुरूवात होते. हा मार्ग आधीच अरूंद आहे. त्यात या खड्ड्यांमुळे वाहनांची कोंडी होते आहे. उल्हास नदीपुलाच्या दोन्ही बाजूंना खड्डे मोठ्या प्रमाणावर पडले आहेत. या खड्ड्यांची मालिका थेट बारवी धरणापर्यंत सुरूच राहते. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे जिकीरीचे झाले आहे.

पाहा व्हिडीओ –

बारवी धरणाकडे जाणारा हा रस्ता असल्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीत हा रस्ता येतो. त्यामुळे स्थानिक नगरपालिका इच्छा असूनही या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी काम करू शकत नाही. या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणासाठी तीन वर्षांपासून वरिष्ठ कार्यालयाला प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र खर्च अधिक असल्याने तो फेटाळला गेला. पुढे या रस्त्याच्या डागडुजीसाठी एमआयडीसी प्रशासनाने निविदा काढली होती. त्यानंतर तात्पुरती डागडुजी करण्यात आली. मात्र यंदाच्या पहिल्या पावसातच या रस्त्याला पुन्हा खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना येथून वाहने नेण्यात मोठी कसरत करावी लागते आहे. पावसाळी पर्यटनासाठीही हा रस्ता महत्वाचा आहे.

ग्रामीण वाहतुकीसाठीही महत्वाचा

टिटवाळा, रायते, दहागाव, पोई, आंबेशिव, ढोके दापिवली या गावातील ग्रामस्थ, नोकरदार बदलापूर स्थानक गाठण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. दुसरीकडे मुरबाड मार्गावरील चोर, राहटोली, मुळगाव, सोनावळे, पिंपळोली, चरगाव या गावातील ग्रामस्थही याच रस्त्यांचा वापर करतात. वालिवली, उल्हास नदीपल्याड एरंजाड गावातही गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे या रस्त्याचा वापरही वाढला आहे. रिक्षा चालकांचा देखभाल दुरूस्तीचा खर्चही या खड्ड्यांमुळे वाढला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या रस्त्यासाठी एमआयडीसी प्रशासनाने १० कोटींची निविदा गेल्या वर्षात जारी केली होती. मात्र कंत्राटदाराने ऐनवेळी काम करण्यास नकार दिला. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया पुन्हा नव्याने राबवण्याची वेळ एमआयडीसीवर आल्याची माहिती एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.