कल्याण – बदलापूर (कासगाव) व्हाया पनवेल ते नवी मुंबई (कामोठे) या प्रस्तावित नवीन रेल्वे मार्गाची उभारणी आणि बदलापूर जवळील कासगाव (चामटोली) येथे नवीन रेल्वे स्थानकाची उभारणी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाच्या बांधकाम विभाग आणि सर्वेक्षण विभागाने मागील वर्षीपासून सर्वेक्षण सुरू केले आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाचे उपमुख्य अभियंता अजय माहारा यांंनी बदलापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांना दिली आहे.
चौथी मुंबई म्हणून कर्जत, खोपोली, बदलापूर, अंंबरनाथ, नेरळ परिसर विकसित होत आहे. नवनवीन गृहप्रकल्प या उभारले जात आहेत. कल्याण शीळ रस्त्यावरील पलावा वसाहतीचे मलंगगड, अंंबरनाथ, नेरळ दिशेने विस्तारिकरण होत आहे. या वाढत्या वस्तीला मुंबईला रेल्वेने जाण्यासाठी कल्याण, ठाणे हा एकमेव रेल्वे मार्ग आहे. अगोदरच कल्याण, डोंबिवली, ठाणे परिसरातील वाढत्या नागरीकरणामुळे ही रेल्वे स्थानके प्रवाशांनी खच्चून भरली आहेत.
या रेल्वे स्थानकातून प्रवास करणे आता वाढत्या गर्दीमुळे जिकरीचे झाले आहे. या गर्दीचे विभाजन करण्यासाठी कल्याण ते मुंबई रेल्वे मार्गाला पर्याय म्हणून बदलापूर कासगाव व्हाया पनवेल मार्गे नवी मुंबईतील कामोठे या नवीन रेल्वे मार्गाची उभारणी करण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी बदलापूरचे नियोजनकार राम पातकर यांनी केंद्रीय रस्ते आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
केंद्रीय मंत्री गडकरी यांनी पातकर यांच्या पत्राचा दाखला देत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना एक पत्र लिहिले होते. या पत्रात बदलापूर व्हाया कासगाव मोर्बे, चौक ते पनवेल, नवी मुंबईतील कामोठे रेल्वे मार्गाचे महत्व विशद केले होते. या पत्राची दखल घेत रेल्वे मंत्री वैष्णव यांनी मंत्री गडकरी यांना पत्र पाठवून या नवीन रेल्वे मार्गावर रेल्वे प्रशासन गांभीर्याने विचार करत असल्याचे कळविले आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशाप्रमाणे रेल्वेने बदलापूर जवळील कासगाव (चामटोली) ते वांगणी, मोर्बे, चौक ते पनवेल व्हाया नवी मुंबई जवळील कामोठे या ३४ किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गासाठी मागील वर्षापासून सर्वेक्षण सुरू केले आहे. तसेच, कासगाव येथे रेल्वे स्थानक उभारणीसाठीचे नियोजन केले जात आहे, असे कळविले आहे. या नवीन रेल्वे मार्गामुळे कर्जत, बदलापूर, अंबरनाथ परिसरातील प्रवाशांना कल्याण, ठाणे, मुंबईतील रेल्वे स्थानकांवर येणारा प्रवासी भार कमी होण्यास मदत होणार आहे. अशाच पध्दतीने कल्याण ते कळवामार्गे वाशी रेल्वे सुरू करण्यासाठी पूर्वीपासून रेल्वे प्रवासी संघाचे डोंबिवलीतील भालचंद्र लोहकरे अनेक वर्षापासून प्रयत्नशील होते.
रेल्वे स्थानकांमधील वाढती गर्दी, वाढते रेल्वे अपघात विचारात घेता आता मुंबई, नवी मुंबईला जाण्यासाठी पर्यायी रेल्वे मार्गाची गरज आहे. या गरजेतून बदलापूर, पनवेल ते नवी मुंबई रेल्वे मार्गाची लवकर उभारणी होणे आवश्यक आहे. अशाच पध्दतीने कल्याण-कळवामार्गे वाशी रेल्वे मार्गासाठी ही प्रयत्न होणे गरजेचे आहेत. – लता अरगडे, अध्यक्षा, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ.