बदलापूर: बदलापुरात विकासकामांच्या घोषणा होत असल्या, मेट्रोचे गोडवे गायले जात असले तरी प्रत्यक्षात मूलभूत सुविधांची उणीव अजून कायम आहे. बदलापूर पश्चिमेतील सोनिवली गावातील स्मशानभूमी याचे ताजे उदाहरण आहे. येथे गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही सोयीसुविधा नाहीत. इतकेच नव्हे तर, छप्पर नसल्याने पावसात अंत्यविधी करणे अवघड झाले असून, गावकऱ्यांना मृतदेहाची अंत्यविधी करण्यासाठी डिझेलचा मारा स्वखर्चातून करावा लागतो आहे. त्यामुळे मृतदेहाची विटंबना होत असून त्याविरूद्ध स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

स्मशानभूमींचा विकास आणि त्याची पुनर्बांधणी हा अनेकदा चर्चेचा विषय ठरतो. स्मशानभूमीतील दुरावस्थेची अनेकदा चर्चा होते. मात्र नातलगाच्या अंत्यविधीवेळी त्या सर्व प्रश्नांवर बोट ठेवणे तितके प्राधान्याचे नसते. त्यामुळे अनेकदा नागरिक आहे त्या स्थितीत अंत्यविधी उरकून घेतात. मात्र स्मशानभूमींची दुरावस्था जैसे थे राहिली आहे. काही वर्षांपूर्वी बदलापूर पश्चिमेतील सर्वात मोठ्या मांजर्ली स्मशानभूमीत मृताच्या नातेवाईकांना जगात कुठूनही अंत्यविधी पाहता यावा यासाठी लाखो रूपये खर्च करून लाईव्ह दर्शन सुविधा सुरू केली. मात्र ती आजतागायत वापरात आल्याचे दिसत नाही. अशीच स्थिती शहरातील इतर स्मशानभूमींचीही आहे.

उल्हास नदी किनारी असलेल्या स्मशानभूमींपैकी सोनिवलीची एक स्मशानभूमी आहे. २००५ मध्ये आलेल्या महापुरात ही स्मशानभूमी वाहून गेली होती. त्यानंतर पालिकेने तात्पुरते पत्र्याचे छप्पर टाकून डागडुजी केली. मात्र काही वर्षांतच तेही कोसळले. कोरोना काळात तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी २७ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याचे जाहीर केले. तसे फलकही लावण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात काहीच काम झाले नाही, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तो निधी गेला कुठे, असा सवाल आता ग्रामस्थ उघडपणे विचारू लागले आहेत.

नुकतेच या गावातील एका व्यक्तीच्या निधनानंतर अंत्यसंस्काराची वेळ आली. पावसामुळे सरणाची लाकडे पूर्ण भिजलेली होती. छप्पर नसल्याने लाकडे पेटत नव्हती. अखेर अंत्यसंस्काराची वेळ लांबू नये म्हणून ग्रामस्थांनीच ३० लिटर डिझेल विकत आणून मृताला अग्नी दिला. या प्रकारामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

इथे जगणे तर कठीण झालच आहे पण आता मरणेही कठीण झाले आहे. निधी मंजूर असूनही काम का झाले नाही, पालिकेने तातडीने चांगली स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आता होते आहे. तर मृताच्या नातेवाईकांनी स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता उखडून गेला असून, वाट निसरडी झाली आहे. अशा अवस्थेत अंत्ययात्रा पार पाडणेच कठीण असल्याची खंत व्यक्त केली.

स्मशानभूमी दुरुस्तीच्या कामाची निविदा मंजूर झाली असून, प्रशासकीय मंजुरीदेखील मिळाली आहे. लवकरच येथे काम सुरू करून आवश्यक सर्व सुविधा देऊन चांगल्या स्थितीत स्मशानभूमी उभारली जाईल, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.