बदलापूर : विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीपासून बदलापूर शहरात शिवसेनेचे वामन म्हात्रे आणि भाजप आमदार किसन कथोरे यांच्यात संघर्ष सुरू आहे. पालिका निवडणुकांच्या तोंडावर हा संघर्ष एकीकडे वाढलेला असतानाच आता आमदार किसन कथोरे यांच्या वाढदिवसानिमित्त चक्क वामन म्हात्रे यांनीच शुभेच्छा दिल्याने चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे दोन पक्षांतील संबंधही गेल्या काळात ताणले गेले होते. त्यामुळे कथोरेंना पाठिंबा देण्याची इच्छा असलेल्यांनाही म्हात्रे यांच्या भूमिकेकडे पाहून निर्णय घ्यावा लागत होता. मात्र समाज माध्यमांवर दिलेल्या या शुभेच्छांमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी मुरबाड विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये फूट पाहायला मिळाली. येथे उघडपणे बंडाळी झाली नसली तरी शिवसेना आणि भाजपातील प्रमुख नेत्यांमध्ये युद्ध पाहायला मिळाले. भाजपचे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या प्रचारापासून शिवसेनेचे शहर प्रमुख वामन मात्र यांनी फारकत घेतली होती. इतकेच नव्हे तर त्याच काळात शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याला कथोरे यांनी गळाला लावले. त्यावरून म्हात्रे यांनी कथोरे यांना इशारा दिला होता. यांच्यातील संबंध या काळात ताणले गेले. त्यामुळे महायुतीचे आणि आमदार किसन कथोरे यांचे प्रचाराचे काम करण्याची इच्छा असणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचाही हिरमोड झाला होता. या काळात आमदार कथोरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मदत घेतली होती. एकनाथ शिंदे यांनीही त्यावेळी शिवसेनेच्या अनेक वरिष्ठ पदाधिकारी, माजी नगरसेवक यांना वैयक्तिक संपर्क करून आमदार किसन कथोरे यांचा प्रचार करण्याचा सल्ला दिला होता. विशेष म्हणजे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अगदी घाईगडबडीत आयत्यावेळी एकनाथ शिंदे यांनी किसन कथोरे यांच्यासाठी एक प्रचार सभा घेतली. या प्रचार सभेनंतर स्थानिक पातळीवरील चित्र पालटले असे बोलले जाते.
निकालानंतर मात्र आमदार किसन कथोरे यांनी प्रचारात विरोधी काम करणाऱ्या अनेकांना इशारा दिला होता. सर्व माजी एका बाजूला आणि एक आजी एका बाजूला अशा स्थिती होती. एका आजी आमदाराने सर्व माजींना आडवे करून टाकले, असे विधान आमदार किसन कथोरे यांनी त्यावेळी केले होते. तसेच या माजींना पुन्हा आजी होऊ देणार नाही, असाही थेट इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर विविध कार्यक्रमानिमित्त आमदार किसन कथोरे आणि शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी एकमेकांवर टीकास्त्र सोडले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आमदार किसन कथोरे यांनी पालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करून खळबळ उडवून दिली होती.
१९ सप्टेंबर हा आमदार किसन कथोरे यांचा वाढदिवस असतो. ठाणे जिल्ह्यातील तसेच राज्यातील विविध भागातील अधिकारी राजकीय नेते पदाधिकारी या वाढदिवसासाठी आवर्जून येत असतात. शुक्रवारी शहरात आमदार किसन कथोरे यांच्या वाढदिवसाची चर्चा रंगली असतानाच शिवसेनेचे बदलापूर शहर प्रमुख वामन म्हात्रे त्यांच्या समाजमाध्यम खात्यावरून आमदार किसन कथोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छांनी शहरात राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
शहरातील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी चिन्ह आणि राजकीय शिष्टाचार टाळून फलकबाजी करत आमदार किसन कथोरे यांना शुभेच्छा देत असताना शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी थेट आपल्या अधिकृत खात्यावरूनच शुभेच्छा दिल्याने अनेक शिवसेनेचे पदाधिकारी बुचकळ्यात पडले आहेत.
वैयक्तिक संबंध वेगळे
याबाबत वामन म्हात्रे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी अशा शुभेच्छा दिल्याचे मान्य केले. माझे आमदार किसन कथोरे यांच्याशी वैयक्तिक वाद नाहीत. ते आमच्या शहराचे आमदार आहेत. मी कायमच त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांची प्रगती व्हावी ही माझी सदिच्छा आहे. पक्ष वेगळा आणि वैयक्तिक संबंध वेगळे आहेत. पक्षाची भूमिका मी वेळोवेळी मांडलेले आहेत. पण वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणे हे राजकारणा पलीकडचे आहे, अशी प्रतिक्रिया वामन म्हात्रे यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.