प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वापराने जलप्रदुषण होऊन पर्यावरणाची हानी होते. केद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती वापरावर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे पालन करण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने पालिका हद्दीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशोत्सव काळात गणपतीच्या, नवरात्रोत्सव काळात देवीच्या मूर्ती वापरावर बंदी घातली आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींसह त्यापासून तयार केलेल्या इतर कोणत्याही वस्तूंचा वापर गणेशोत्सव, नवरात्रोत्सव काळात शहरात होऊ नये म्हणून यावेळी प्रथमच कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत गणेश मूर्ती तयार करणाऱ्या कारखाना चालकांना आणि मूर्ती विक्रेत्यांना पालिकेची परवानगी घेऊन मूर्ती निर्मिती आणि विक्री करावी लागणार आहे. मूर्तिकारांनी शाडूच्या, पर्यावरण स्नेही, नैसर्गिक रंग वापरून मूर्ती तयार कराव्यात. जलप्रदूषण थांबून पर्यावरणाची होणारी हानी टळणार आहे. नागरिकांनी पर्यावरण स्नेही, शाडूच्या मूर्ती खरेदीला सर्वाधिक प्राधान्य द्यावे, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

दोन महिन्यापूर्वी पालिकेतर्फे कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील गणेश मूर्तिकारांची एक बैठक आयोजित केली होती. त्यावेळीही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तिंमुळे होणारी हानी याविषयावर चर्चा करण्यात आली होती. मूर्तिकारांनी शाडुच्या मूर्ती उत्पादनावर भर देण्याचे आवाहन करण्यात आले होते. मूर्तिकारांनी त्यावेळी पर्यायी व्यवस्था होईपर्यंत या निर्णयाचा विचार करण्याचे आवाहन केले होते. आता केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाची काटेकोर कठोर अंमलबजावणी करावी लागणार असल्याने प्रशासन आता सतर्क झाले आहे.

पालिकेची परवानगी न घेता विना परवाना गणेश मूर्ती, नवरात्रोत्सव काळात देवीच्या मूर्ती विकणाऱ्यांवर पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. गणपती, देवीचे मूर्तिकार, विक्रेत्यांनी पालिकेच्या प्रभाग कार्यालयातून गणेश मूर्ती निर्मिती आणि विक्रीची परवानगी घ्यावी. या मंजुर परवानगीची प्रत मूर्ती उत्पादन कारखाना, विक्री दुकानाच्या दर्शनी भागात लावून ठेवण्यात यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.

…अशा नागरिकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार –

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव काळात नागरिकांनी पर्यावरणपूरक, पाण्यात सहज विरघळणारे, काही दिवसानंतर आपोआप विघटित होईल असे पूजा साहित्य वापरावे. यामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही. जलप्रदूषण टळणार आहे, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार करून त्याची कोणी गुप्तपणे विक्री करत असेल. त्या नदी, खाडीत विसर्जित करण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा नागरिकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पर्यावरण संवर्धनाचा जागर होण्यासाठी भाविकांचा एक लाखाचा विमा काढणार –

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती निर्मिती, विक्रीवर बंदी असल्याने आपण शाडू, लाल माती, मूलतानी माती, नैसर्गिक रंगात मूर्ती विक्रीसाठी ठेवल्या आहेत. पर्यावरण स्नेही गणपती ही संकल्पना घेऊन आपण गणेश मूर्तिंची विक्री करतो. मूर्ती नोंदणीसाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतो. गणेशोत्सव काळात पर्यावरण संवर्धनाचा जागर होण्यासाठी भाविकांचा एक लाखाचा विमा काढणार आहोत. अशी माहिती डोंबिवलीमधील गणेश मूर्ती विक्रेते विनय पालव यांनी दिली आहे.