Thane News : ठाणे : मद्याऐवजी ऐवजी लिंबू सरबत देऊ का असे विचारले असता, पाच ते सहा जणांच्या टोळक्याने बारमधील कर्मचाऱ्याला मारहाण करत बारमधील साहित्याची तोडफोड केल्याचा प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी बारच्या व्यवस्थापकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हिरानंदानी मेडोज भागात एक बार आहे. हे बार दुपारी १२ ते रात्री १.३० पर्यंत दररोज सुरु असते. २९ ऑगस्टला या बारमध्ये दोघे आले. त्यांनी मद्याची मागणी केली. दोघांनी अतिप्रमाणात मद्य सेवन केले होते. त्यामुळे बारमधील कर्मचाऱ्याने त्यांना मद्याऐवजी लिंबू सरबत देऊ का असे विचारले. यामुळे त्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी कर्मचाऱ्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या वादानंतर ते ग्राहक मद्य सेवनाचे बील भरुन निघून गेले. ३१ ऑगस्टच्या दिवशी त्या दोन ग्राहकांपैकी एकजण त्याच्या पाच ते सहा साथिदारांसोबत बारमध्ये शिरला. त्यांनी एका कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. तसेच बारमधील साहित्यांची तोडफोड केली. या प्रकरणानंतर बारच्या व्यवस्थापकाने चितळसर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल झाला आहे.