scorecardresearch

बदलापूरः अखेर बारवी धरण ओव्हरफ्लो ; जिल्ह्याची पाणीचिंता मिटली

ठाणे जिल्ह्याच्या पाण्यासाठी महत्वाचे असलेले बारवी धरण गुरूवारी सायंकाळी पूर्ण क्षमतेचे भरले.

बदलापूरः अखेर बारवी धरण ओव्हरफ्लो ; जिल्ह्याची पाणीचिंता मिटली
( बारवी धरण )

ठाणे जिल्ह्याच्या पाण्यासाठी महत्वाचे असलेले बारवी धरण गुरूवारी सायंकाळी पूर्ण क्षमतेचे भरले. सायंकाळच्या सुमारास धरणाने आपली ३४० दशलक्ष घनमीटरची पाणी पातळी गाठली. त्यामुळे ठाणे जिल्ह्याची पाणी चिंता मिटली आहे. बारवी धरणाच्या पाण्यावर जिल्ह्यातील जवळपास सर्वच महापालिका आणि औद्योगिक वसाहतींचा पाणीपुरवठा अवलंबून आहे.

ठाणे जिल्ह्याला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. हे बारवी धरण गुरुवारी सायंकाळी पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले. गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत बारवी धरण आपल्या ३४०.४८दशलक्ष घनमीटर क्षमतेने पूर्ण भरले होते. बारावी धरणाची उंची ७२.६०मीटर असून गुरुवारी धरणाने ही उंची गाठली. ही पाणी पातळी गाठली त्यामुळे ठाणे जिल्ह्याची पाणी चिंता मिटली आहे. बारावी धरणाच्या पाण्यावर ठाणे जिल्ह्यातील बहुतांश महापालिका, सर्वच औद्योगिक वसाहती आणि काही ग्रामपंचायती अवलंबून आहेत. मे महिन्याच्या अखेरीस बारावी धरणाने तळ गाठला होता. तर जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने ठाणे जिल्ह्यावर पाणी संकट गडद झाले होते. मात्र जुलै महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात संतधर पावसाने बारवी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ केली.

मात्र जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा पावसाने दांडी मारली. परिणामी धरण भरण्याचा वेग मंदावला होता. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून संततधार पावसाने धरणात पाण्याचा साठा केला. गुरुवारी सकाळी धरणात ९८टक्के इतका पाणीसाठा होता. तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत बारवी धरण आपल्या पूर्ण क्षमतेने भरले होते. बारवी धरण भरल्याने जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटली आहे. त्यामुळे समाधान व्यक्त केले जाते आहे. बारवी धरणाच्या स्वयंचलत गोडबोले दरवाज्यातून अल्प प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू होता.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या