ठाणे : हिरानंदानी इस्टेट येथील कावेसर भागात १५० वर्षांहून जुन्या तलावाभोवती सुशोभिकरण केले जाणार आहे. परंतु या सुशोभिकरणास हिरानंदानी इस्टेट भागातील काही रहिवाशांनी आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते, संस्थांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे. सुशोभिकरणाच्या नावाखाली नैसर्गिक रुप नष्ट करण्याचे कार्य सुरु असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच, तलाव परिसराचे सुशोभिकरण केल्यास तलावाभोवती येणाऱ्या पक्षी तसेच इतर जैवविविधतेस धोका निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
ठाणे शहराला तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. परंतु अनेक तलावांवर आणि त्यालगत अनधिकृत बांधकामे निर्माण झाल्याने तलाव नष्ट झाले. घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेट परिसरात १५० वर्ष जुने कावेसर तलाव आहे. या तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे, येथे पांढरे कमळ देखील नजरेस पडते. विविध प्रजातींची फुले देखील येथे पाहण्यास मिळतात. तसेच, स्थलांतरीत पक्षी आणि विविध प्रजातींचे पक्षी येथे येतात. त्यामुळे पक्षी निरीक्षण करण्यासाठी हा एक उत्तम भाग आहे. या जैवविविधतेमुळे हिरानंदानी इस्टेट भागातील अनेक नागरिक योगासन, वाचन किंवा फेरफटका मारण्यासाठी येथे जातात.
हिरानंदानी इस्टेट भागात महापालिकेची उद्याने, बागा आहेत. परंतु येथील रहिवाशांना हा नैसर्गिक तलाव आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरतो. गेल्याकाही दिवसांपासून या तलावाभोवती सुशोभिकरणाची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर येथे फलक लागले. ठाणे महापालिकेकडून हे सुशोभिकरण केले जाणार आहे. हिरानंदानी इस्टेट भागातील काही नागरिकांनी या सुशोभिकरणास विरोध दर्शविण्यास सुरुवात केली. रविवारी या तलावाजवळ कामाचे भूमीपूजन ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते झाले. येथील काही रहिवाशांनी या कार्यक्रमापूर्वी आपला विरोध दर्शविला.
या सुशोभिकरणामुळे येथील नैसर्गिक रुप बदलणार आहे. आम्हाला निसर्ग हवा आहे. कोणतेही सुशोभिकरण नको अशी मागणी हिरानंदानी भागातील काही रहिवाशांनी केली आहे.
तर ५.६ एकर जागेवर असलेल्या या उद्यानातील हिरवळीला कोणतीही बाधा न आणता केवळ १० टक्के भागाचा विकास करण्यात येणार आहे. रहिवासी सध्या खडकाळ तर पावसाळ्यात चिखल तुडवत चालत असलेल्या पायवाटेवर पदपथांची निमिर्ती करण्यात येतील. या पदपथामुळे वयस्कर नागरिकांना चालणे सुलभ होणार आहे. योग साधना तसेच झुंबा व इतर गायन, गायन वादनाच्या हौशी कलाकारांसाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. खुली जिम सुरु करण्यात येणार आहे. उद्यानात भरपूर हिरवाई असल्याने फुलपाखरू बागेची निर्मिती केली जाणार आहे. तलाव आणि उद्यान याच्या मध्ये स्काय वॉच टॉवर उभारला जाणार आहे, जेणेकरून रहिवाशांना एकाच वेळी हिरवळ आणि तलावाचे निरीक्षण करता येईल असा दावा भूमीपूजनावेळी म्हस्के यांनी केला.
हिरानंदानी इस्टेट भागात सार्वजनिक उद्यान आहे. त्यामुळे येथे तलावभोवती सुशोभिकरणाची आवश्यकता नव्हती. या तलावाभोवती स्थलांतरीत पक्षी, मुंगुस असे प्राणी, पक्षी दिसतात. येथे जैवविविधता आहे. त्यामुळे तलावाजवळ केवळ सुरक्षा रक्षक तैनात केले तरी पुरेसे आहे. सुशोभिकरणानंतर या तलाव आणि परिसराचे नैसर्गिक रुप नष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुशोभिकरणास विरोध आहे. – स्वाती दिवेकर, रहिवासी, हिरानंदानी इस्टेट.
कावेसर तलावाभोवती जैवविविधता आहे. येथे विविध पक्षी पाहायला मिळतील. सुशोभिकरणानंतर येथे झुंबा, गायन, वादन वैगरे केले जाणार आहे. त्यामुळे पक्षी आवाजाने येथे येणार नाहीत. तसेच तलावाभोवती जुनी झाडे आहेत. त्यामुळे निसर्ग टिकविणे आवश्यक आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत आम्ही या कामाविषयी माहिती मागविली आहे. तसेच नागरिकांना एकजूट करून आंदोलन उभारणार आहोत. – निशांत बंगेरा, ठाणे ग्रीन कलेक्टिव्ह.