कल्याण – मध्य रेल्वेच्या कल्याण ते आसनगाव, खडवली, कर्जत आणि दिवा-वसई रेल्वे मार्गावरील भिवंडी खारबाव रेल्वे स्थानकांच्या दरम्यान मागील सोमवार, मंगळवारी दिवसभरात चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. कल्याण, कर्जत, डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यांमध्ये या प्रवासी मृत्युप्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.

भिवंडी परिसरात राहत असलेला एक ३५ वर्षाचा नागरिक मंगळवारी रात्री दिवा वसई रेल्वे मार्गावरील भिवंडी ते खारबाव रोड रेल्वे स्थानकांच्या दरम्यान रेल्वे मार्गातून पायी चालला होता. पावसाळा असल्याने रेल्वे मार्गाच्या दुतर्फा रानगवत फोफावले आहे. या गवतामुळे रेल्वे मार्गाच्या बाजुने चालणे शक्य होत नाही. त्याच वेळी समोरून एक एक्सप्रेस आली.

एक्सप्रेसच्या समोरील दिव्यांचा प्रखर झोत डोळ्यांवर आल्याने संबंधित प्रवासी गांगरला. त्याला एक्सप्रेसची जोरदार ठोकर बसून तो जागीच मरण पावला. सकाळी भिवंडी खारबाव दरम्यान रेल्वे मार्गात एक प्रवासी पडला असल्याची माहिती मिळाल्यावर डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी त्या मृत प्रवाशाचा ताबा घेतला. या प्रवाशाची ओळख पटली नाही, असे पोलिसांनी सांगितले. उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.

मंगळवारी सकाळी कल्याण रेल्वे स्थानकाजवळ प्रवाशांनी खचाखच भरलेल्या लोकलमधून प्रवास करताना तोल जाऊन रेल्वे मार्गात पडल्याने राहुल उमेश सिंह (३०) या प्रवाशाचा मृत्यू झाला. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणाची नोंद आहे. उपनिरीक्षक जेधे तपास करत आहेत. मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान टिटवाळा ते आसनगाव रेल्वे स्थानका दरम्यानच्या खडवली रेल्वे स्थानकाजवळ एका एक्सप्रेसची ठोकर बसून एका ४० वर्षाच्या प्रवाशाचा मृत्यू झाला. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.

आसनगाव ते आटगाव रेल्वे स्थानकांच्या दरम्यान रेल्वे मार्गातून प्रवास करताना मंगळवारी दुपारी सुशांत सुरेश ठाकरे (३३) या प्रवाशाचा कामख्या एक्सप्रेसची धडक बसून जागीच मृत्यू झाला. सुशांत ठाकरे हे शहापूर जवळील माऊली किल्ला परिसरातील रहिवासी होते. ते बँकेत नोकरीला होते. ते नियमित नोकरीनिमित्त आसनगाव ते मुंबई लोकलने प्रवास करायचे. रेल्वे मार्गातून पायी जात असताना त्यांना पाठीमागून एक्सप्रेस येत असल्याचे जाणवले नाही. त्यांना समजेपर्यंत एक्सप्रेस त्यांना धडक देऊन पुढे गेली होती. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. उपनिरीक्षक भोसले याप्रकरणाचा तपास करत आहेत.

सोमवारी संध्याकाळी साडे सहा वाजता भिवपुरी ते कर्जत रेल्वे स्थानकांच्या दरम्यान रेल्वेची धडक बसून कर्जत परिसरातील गावात राहणारे तुषार गोविंद कुर्ले (२८) यांचा जागीच मृत्यू झाला. ते रेल्वे मार्गातून पायी जात असताना ही घटना घडली. कर्जत लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.

प्रवाशांनी रेल्वे मार्गातून प्रवास करू नये म्हणून रेल्वे प्रशासनाने रेल्वे मार्गाच्या दुतर्फा लोखंडी जाळ्या, संरक्षक भिंती बांधल्या आहेत. तरीही मधला मार्ग म्हणून अनेक प्रवासी रेल्वे मार्गातून प्रवास करतात. त्यामधून हे अपघात होतात, असे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.