BJP : ठाणे : भिवंडी येथे भाजप युवा मोर्चाचा जिल्हा उपाध्यक्ष आणि त्याच्या चुलत भावाची कार्यालयात शिरुन तलवार, सुऱ्याने वार करुन हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सात जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याविरोधात ठाणे ग्रामीण पोलिसांनी आता मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

विकी म्हात्रे, कल्पेश वैती, किसन पवार, गणपत साबळे, हर्षल तांगडी, अजय तांगडी आणि नितेश तांगडी यांना पोलिसांनी अटक केली असून कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी या गुन्ह्यातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यास मंजूरी दिल्याने या गुन्ह्यात मोक्का अंतर्गत कारवाई झाल्याचे ठाणे ग्रामीण पोलिसांनी सांगितले.

भिवंडी येथे भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष पद प्रफुल्ल तांगडी याच्याकडे होते. सुमारे महिन्याभरापूर्वी प्रफुल्ल हे त्यांचा चुलत भाऊ तेजस तांगडी याच्यासोबत कार्यालयात असताना विकी म्हात्रे आणि कल्पेश वैती हे तेथे आले. त्यांनी हातातील तलावर आणि सुऱ्याने प्रफुल्ल तांगडी यांच्यावर वार केले. तेजस हे त्यांना वाचविण्यासाठी गेले असता, त्यांनी त्याच्यावरही हल्ला केला. या घटनेत दोघेही जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

प्रफुल्ल आणि तेजस यांच्या हत्येनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी भाजपच्या पदाधिकारी आणि गावकऱ्यांकडून केली जात होती. अखेर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे, याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली होती. प्रफुल्ल यांची हत्या पूर्व वैमन्यस्यातून हत्या झाली होती. तपासात विकी म्हात्रे आणि त्याच्या इतर साथिदारांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरुपाची असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी २०१३ पासून गर्दी करुन हाणामारी करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, अवैध शस्त्रास्त्र बाळगणे असे गुन्हे एकत्र येऊन केले होते.

ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डाॅ. डी.एस.स्वामी आणि अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांच्या सूचनेनंतर भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बारवे यांनी तपास करुन आरोपींविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांचे कागदपत्र प्राप्त केले. डाॅ. डी.एस. स्वामी यांच्या मार्फत कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्याकडे मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई करण्यासाठी अहवाल सादर केला होता. संजय दराडे यांनी आरोपींविरोधात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मंजूरी दिल्याने आरोपींविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.