ठाणे : ठाणे महापालिका पाणी पुरवठा विभागाने मोहिमेत शहरातील अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्याची कारवाई सुरू केली असून त्यापाठोपाठ आता भिवंडी निजामपुर शहर महापालिकेनेही अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. यामध्ये शहरातील १० अनधिकृत नळ जोडण्या महापालिकेच्या पथकाने एकाच खंडित करून पाण्याचे पंप जप्त केले आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत नळजोडण्यांविरोधात पाणी पुरवठा विभागाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेत दुसऱ्या दिवशी दिवा आणि मुंब्रा भागात अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. या अनधिकृत नळजोडण्याप्रकरणी पालिकेकडून गुन्हे दाखल केले असून त्याचबरोबर पालिकेने अनधिकृत टँकर भरणाप्रकरणी दोन गुन्हे दाखल केले आहेत. एकीकडे ठाणे महापालिकेच्या कारवाईचा वेग वाढवा असतानाच, त्याशेजारी असलेल्या भिवंडी निजामपुर शहर महापालिकेनेही अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे.

बेकायदा नळ जोडणीधारकांचे धाबे दणाणले

भिवंडी निजामपुर शहर महापालिकेचे आयुक्त अनमोल सागर यांनी प्रशासकीय कामकाज गतिमान करण्याबरोबरच सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याशिवाय, पालिकेच्या करवसुलीत वाढ व्हावी आणि जमा झालेल्या महसुलातून नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी कर वसुलीवर भर देण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय, बेकायदा नळ जोडणीधारकांकडेही त्यांनी आपला मोर्चा वळविला असून यामुळे बेकायदा नळ जोडणीधारकांचे धाबे दणाणले आहेत.

कारवाई कुठे झाली

भिवंडी निजामपूर शहर महापालिका क्षेत्रातील मौजे-नागाव . खान कंपाऊंड येथील तळ अधिक सात मजली इमारतीची कोणत्याही प्रकारची महापालिकेची कर आकारणी लागू झालेली नाही. तरीही या इमारतीकरिता महापालिकेची रीतसर परवानगी न घेता अनधिकृतपणे महापालिकेचा जल वाहिनीवरून १० नळजोडण्या घेण्यात आल्या होत्या. त्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी खंडित करून पाण्याचे पंप जप्त केले. ही कारवाई महापालिकेचे आयुक्त अनमोल सागर यांच्या आदेशाने पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पटणावर, उप अभियंता उद्धव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली विराज भोईर यांच्या पथकाने केली.