ठाणे : भिवंडीत भाजपच्या युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षाची आणि त्याच्या भावाची कार्यालयात शिरुन निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हल्लेखोरांनी सपासप वार केल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर भिवंडीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून हत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.
भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि त्यांचा भाऊ तेजस तांगडी यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री भिवंडी तालुक्यातील खर्डी भागातील त्यांच्या कंपनीच्या कार्यालयात प्रफुल्ल, तेजस आणि त्यांचे सहकारी बसले होते. त्याचवेळी काहीजण त्यांच्या कार्यालयात शिरले. धारदार शस्त्रांनी प्रफुल्ल, तेजस आणि त्यांच्या एक सहकाऱ्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात प्रफुल्ल आणि तेजस यांच्यावर सपासप वार करण्यात आले. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने प्रफुल्ल आणि तेजस यांचा मृत्यू झाला. तर सहकाऱ्याला एका रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कळते आहे.
घटनेची माहिती भिवंडी तालुका पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरु आहे. त्यांच्यावरील हल्ला राजकीय आहे की, पूर्व वैमन्यस्यातून याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर भिवंडीत तणाव आणि भितीचे वातावरण पसरले आहे. हल्लेखोरांचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.