वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रकल्प; सुसाध्यता अहवाल तयार करण्याचे काम सुरू
ठाणे-कल्याण-नवी मुंबई या त्रिकोणातील वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा व्हावी यासाठी कल्याण ते शीळफाटा या मार्गावर उन्नत मार्ग उभारणीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा विस्तार थेट भिवंडीपर्यत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना रस्ते विकास महामंडळास देण्यात आल्या आहेत. कल्याण-शीळ मार्गावरील वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणानेही या ठिकाणी उड्डाण पुलांच्या प्रकल्पांची आखणी केली आहे. त्यामुळे नियोजित उन्नत मार्गाचा प्रकल्प कागदावरच राहतो की काय अशी शंका मध्यंतरी उपस्थित केली जात होती. या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे भिवंडी ते शीळफाटा अशा नव्या उन्नत मार्गाच्या आखणीतील संभ्रम दूर झाला आहे.
ठाणे, नवी मुंबई, कल्याण, भिवंडी या पट्टय़ातील वाहतूक गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. उरण येथील जवाहरलाल नेहरू बंदरात दाखल होणारा माल भिवंडीतील गोदामांपर्यत पोहचविण्यासाठी शेकडो अवजड वाहने दररोज तळोजा-शीळ रस्त्यावरून मुंब्रा बायपासमार्गे भिवंडीच्या दिशेने मार्गक्रमण करत असतात. नवी मुंबई तसेच आसपासच्या परिसरात गेल्या काही वर्षांत मोठय़ा उद्योगांची उभारणी झाली आहे. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या शहरी उपनगरांमधून नवी मुंबई तसेच आसपासच्या औद्योगिक पट्टय़ात दररोज कामानिमित्त येणाऱ्या प्रवाशांचा आकडाही बराच मोठा आहे. त्यामुळे सकाळ-सायंकाळी गर्दीच्या वेळेत कल्याण-डोंबिवली-शीळफाटा या मार्गावर वाहनांची मोठी कोंडी होत असल्याचे चित्र आहे. भिवंडी-कल्याण-नवी मुंबई या मार्गावर वाहनांची संख्या वाढून त्याचा भार ठाणे शहरातील अंतर्गत वाहतुकीवर पडू लागल्याचे लक्षात येताच राज्य सरकारने रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून या मार्गाचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय मध्यंतरी घेतला. सद्यस्थितीत या रस्त्यावरून दररोज ५४ हजारांहून अधिक वाहनांची येजा असते. क्षमतेपेक्षा अधिक वाहनांची वर्दळ असल्याने चार पदरी रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा निर्णय मध्यंतरी रस्ते विकास महामंडळाने घेतला. तशा स्वरूपाचा प्रस्तावही राज्य सरकारकडे सादर केला. मात्र, या रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडील उच्च दाबाच्या सेवा वाहिन्यांमुळे सहा पदरीकरण करण्यात अडथळे निर्माण होत आहेत.
घोडबंदर ते बोरिवली भुयारी मार्ग?
घोडबंदर मार्गावरून मुंबईतील पश्चिम उपनगरांकडे जाताना होणारी कोंडी लक्षात घेऊन घोडबंदर ते बोरिवली असा भुयारी मार्ग तयार करण्याच्या प्रस्तावासही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली होती. या प्रकल्पाचा सुसाध्यता अहवाल तयार करण्याच्या सूचनाही रस्ते विकास महामंडळास दिल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रुंदीकरणाला उन्नत मार्गाचा पर्याय
रुंदीकरणात अडथळे उभे राहात असल्याचे लक्षात येताच किमान कल्याण ते शीळफाटा या मार्गावर नव्या उन्नत मार्गिकेची उभारणी करण्याचा प्रस्ताव मध्यंतरी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे मांडला होता. या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली असून हा मार्ग थेट भिवंडीपर्यंत उन्नत करण्यात यावा, अशा स्वरूपाच्या सूचना रस्ता विकास महामंडळास देण्यात आल्या आहेत. त्यानुसार रस्ते विकास महामंडळास या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लोकसत्ता ठाणे’ला दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhiwandi shilphata elevated road approved by maharashtra government
First published on: 24-08-2016 at 00:51 IST