ठाणे : ठाणे जिल्ह्यात वाहतुक कोंडीमुळे नागरिक बेजार झाले असताना आता या वाहतुक कोंडीचा फटका गणेशमूर्ती आगमण मिरवणूकीलाही बसत आहे. भिवंडीत अनेक गणेशमूर्ती आगमण मिरवणूका वाहतुक कोंडीत अडकल्या होत्या. त्यामुळे भिवंडी तालुक्याच्या सीमेवर राहणाऱ्या गावकऱ्यांनी त्यांच्या गणेशमूर्ती चक्क बोटीतून प्रवास करत आणल्या. वाहतुक कोंडी आणि रस्ते खराब असल्याने आम्ही हा पर्याय निवडल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, कल्याण शहरात मोठ्याप्रमाणात खड्डे पडले असून नागरिक खड्डे तसेच वाहतुक कोंडीमुळे त्रस्त झाले आहे. या भागातून अवजड वाहनांची वाहतुक होत असल्याने कोंडीत भर पडते. भिवंडी तालुक्यातून ठाणे, कल्याण गाठणाऱ्या नागरिकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचणे कठीण झाले आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनाही त्याचा फटका बसत आहे.
या वाहतुक कोंडीचा फटका गणेशमूर्ती आगमणालाही बसला. भिवंडीतील अनेक गणेशमूर्ती मिरवणूका वाहतुक कोंडीत अडकल्या होत्या. त्यामुळे तालुक्यातील सीमेवरील नांदकर, ईताडे आणि सांगे या गावातील सुमारे ७० ते ७५ घरगुती गणेशमूर्ती चक्क प्रवासी बोटीतून आणल्या. गणेशमूर्ती दरवर्षी कल्याण, गंधारी, बापगाव ते नांदकर या मार्गे गावात मिरवणूका काढत आणल्या जातात. परंतु या वर्षी भिवंडी तालुक्यातील रस्त्यांची अवस्था वाईट झाल्याने नागरिकांना चक्क काळू नदीतून बोटीद्वारे गणेशमूर्ती आणण्याची वेळ आली.
भिवंडी तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे खड्डे आणि कोंडी टाळण्यासाठी आम्ही गणेशमूर्ती प्रवासी बोटीने आणण्याचे ठरविले होते. त्यानुसार गावातील गणेशमूर्ती बोटीने आणल्या. – मनोज प्रकाश पाटील, माजी उपसरपंच, नांदकर.