मागणी घटल्याने दरात घसरगुंडी सुरूच

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या महिनाभरापासून कोंबडी बाजारात आलेली मरगळ आता आणखी वाढली आहे. ‘बर्ड फ्लू’च्या भीतीमुळे ग्राहकांनी कोंबडी खरेदीकडे पाठ फिरवली असून गेल्या दोन-तीन महिन्यांत चिकनच्या मागणीत तब्बल ९० टक्क्यांची घट झाल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. मागणी घसरल्याने दरांतही घसरण झाली असून सध्या ब्रॉयलर कोंबडी १०० रुपये तर, गावठी कोंबडी २०० रुपये किलोने विकली जात आहे. अंड्याच्या दरातही दीड रुपयाने घसरण झाली आहे.

हिवाळ्याच्या कालावधीत चिकनला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असते. परंतु, सध्या थंडीचे दिवस असताना कोंबडी आणि अंडी    यांची मागणी घटत चालली आहे. ‘बर्ड फ्लू’चा फैलाव ठिकठिकाणी होऊ लागल्यामुळे नागरिकांनी भीतीने कोंबडीच्या मांसापासून बनवणाऱ्या पदार्थांकडे पाठ फिरवली आहे. बकऱ्याचे मटण, मासे यांच्या तुलनेत चिकन आणि अंड्याचे दर हे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे असतात. त्यामुळे चिकन आणि अंड्याला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असते. परंतु, बर्ड फ्लूमुळे चिकन आणि अंड्यांच्या मागणीत ९० टक्के घट झाल्याचे चित्र आहे. रविवारच्या दिवशी कोंबडीच्या खरेदीसाठी दुकानात मोठी गर्दी असते. पण सध्या रविवारच्या दिवशी १० ते १५ कोंबड्यांचीसुद्धा विक्री होत नसल्याचे ठाण्यातील कोंबडी विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. कोंबडीच्या मागणीत घट झाल्याने त्यांच्या दरातही घसरण झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

बर्ड फ्लूचा फैलाव होण्यापूर्वी १४० रुपये किलोने ब्रॉयलर कोंबडी तर, २६० रुपये किलोने गावठी कोंबडी आणि ६ रुपये ५० पैशानी प्रति नग अंडे विकले जात होते. गेल्या काही दिवसांत त्यात घट होऊन ब्रॉयलर कोंबडी १०० रुपये किलोने तर, गावठी कोंबडी २०० रुपये किलोने आणि प्रति नग अंडे पाच रुपयांनी विकले जात आहे.

‘बर्ड फ्लू’ची साथ नियंत्रणात

बर्ड फ्लूची साथ आता आटोक्यात आली असून दररोज एक ते दोन पक्षी मृत अवस्थेत आढळत आहेत. त्यामध्ये कोंबड्यांचा समावेश नाही. मात्र, अद्यापही नागरिकांच्या मनातून बर्ड फ्लूची भीती गेलेली नसल्याने चिकण आणि अंड्याच्या मागणीत घट झाली आहे. चिकण, अंडी शिजवून खाल्ल्यास कोणताही धोका मानवाला होणार नसल्याचे शासनाकडून तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा पशुसंवर्धन विभाग उपायुक्त वी. वी. धुमाळ यांनी दिली. बर्ड फ्लूची साथ ही परदेशी पक्ष्यांसह येत असते. फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात हे पक्षी परततात, तेव्हा ही साथ देखील जाते. अनेकदा ही साथ कमी प्रमाणात पसरत असते. मात्र, यंदाच्या वर्षी बर्ड फ्लूची साथ मोठ्या प्रमाणात पसरली असून त्याचा फटका कुक्कुटपालन व्यवसायाला बसला आहे, असेही त्यांनी सांगितले.

आधी करोनामुळे आणि आता बल्र्ड फ्लूमुळे कोंबडी विक्रीच्या व्यवसायावर मोठे संकट ओढवले आहे. बर्ड फ्लूच्या भीतीमुळे कोंबडी आणि अंड्यांच्या मागणीत प्रचंड घट झाली आहे. – चंद्रशेखर तेरडे, कोंबडी विक्रेते, ठाणे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bird flu hits chicken market akp
First published on: 03-02-2021 at 01:08 IST