ठाणे : येऊरच्या जंगलात वाढदिवस साजरा करणे तरुणाला महागात पडले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरिश ठाणेकर असे त्या तरुणाचे नाव आहे. तो ठाण्यातील कोपरी भागात राहतो.संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर असलेला येऊरचा भाग हा ठाणे महापालिका क्षेत्रात येतो. हा परिसर पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात मोडतो. असे असतानाही या भागात हॉटेल्स, धाबे आणि रिसॉर्ट्स बिनधास्तपणे सुरू असतात. या ठिकाणी रात्रीच्या पार्ट्या सुरू असून या पार्ट्यांमध्ये डीजे लावला जातो. फटकेही फोडण्यात येतात. त्याचा परिणाम वन्यजीवांवर होतो. हे मुद्दे सातत्याने उपस्थित होत असले तरी त्याठिकाणी प्रभावीपणे कारवाई होत नाही.
अशाचप्रकारे, येऊरमध्ये रात्री फटाके फोडून वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर वायरल झाला होता. त्यानंतर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी स्वप्नील महिंद्रकर यांनी देखील येऊर परिसरात रात्री उशिरापर्यंत धिंगाणा सुरु असून, वनविभाग आणि ठाणे महापालिका प्रशासनाच्या वरदहस्ताने हॉटेल्स, धाबे आणि रिसॉर्ट्स बिनधास्तपणे सुरू असल्याचा गंभीर आरोप केला होता. याबाबत राजकीय पातळीवर देखील तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यामुळे आता येऊरमध्ये पार्टीचे आयोजन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केले जात आहेत.
येऊरच्या जंगलातील एका शेतघरावर (फार्महाऊस) शुक्रवारी अमरिशने वाढदिवस साजरा करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा परिसर वन्यक्षेत्र आणि संवेदनशिल क्षेत्र म्हणून घोषीत असतानाही वन्यजिवाला हानी होईल अश्या प्रकारे फटाके, लाऊडस्पिकर परवानगी नसताना लावल्यामुळे अमरिश याच्यावर वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.