ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलेच तापले असतानाच, भाजप नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी “रावणाच्या अहंकाराचे दहन करावे लागेल, तुम्ही तयार आहात का?” असे विधान केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. नाईक यांच्या विधानाला शिवसेना (शिंदे गट) खासदार नरेश म्हस्के( naresh mhaske) यांनी प्रतिउत्तर दिले आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे.
वर्तकनगर येथील भाजपच्या जिल्हा कार्यालयात आयोजित पक्ष बैठकीत बोलताना गणेश नाईक यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले होते. त्यावेळी त्यांनी “नवी मुंबई महापालिकेत मी पक्षाला सत्ता मिळवून दिली, ठाण्यातही सत्ता मिळवून देऊ शकतो. पण, त्यासाठी रावणाच्या अहंकाराचे दहन करावे लागेल, तुम्ही तयार आहात का?” अशी विचारणा त्यांनी केली होती. या वक्तव्याला कार्यकर्त्यांकडून टाळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर “वरिष्ठ नेते महायुतीबाबत निर्णय घेतील. पण कार्यकर्त्यांचा सन्मान न झाल्यास मी पहिला विरोध करणारा असेन.” असे सांगत नाईकांनी युतीबाबतही स्पष्ट भूमिका मांडली होती.
नरेश म्हस्के यांचे प्रतिउत्तर
नाईक यांच्या “रावणाच्या अहंकाराचे दहन” या विधानावर खासदार नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “रावण खलनायक का ठरला? कारण त्याने दुसऱ्याच्या पत्नीचं अपहरण केलं. नाईकांनी हे विधान एकनाथ शिंदे यांच्यासाठी अप्रत्यक्षपणे वापरले नसतील, त्यांनी हे विधान स्वतःबद्दलच केले असेल”, असा टोला म्हस्के यांनी लगावला. “रावणाच्या पावलावर पाऊल ठेवून कोण चाललंय, हे सगळ्या जगाला माहिती आहे. त्यामुळे आम्हाला जास्त बोलायला लावू नका की राम कोण आणि रावण कोण “, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
शिंदे-नाईक संघर्षाची पार्श्वभूमी
गेल्या काही महिन्यांपासून ठाण्यात एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि गणेश नाईक (ganesh naik) यांच्यात संघर्ष वाढत चालला आहे. नाईकांनी ठाण्यात जनता दरबार घेत शिंदे गटाला डिवचले होते. नवी मुंबई महापालिकेतील प्रारूप प्रभाग रचनेवरून नाईक नाराज होते आणि त्यांच्या समर्थकांनी हजारो तक्रारी दाखल केल्या होत्या. यामुळे दोघांतील राजकीय तणाव अधिकच तीव्र झाला आहे. गणेश नाईक यांनी “रावणाच्या अहंकाराचे दहन” असे वक्तव्य करताना थेट कोणाचे नाव घेतले नाही. पण ठाण्यातील सध्याच्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हे विधान शिंदे गटावर अप्रत्यक्ष टोलासारखेच मानले जात आहे. त्याउलट, शिवसेनेचे खासदार म्हस्के यांनी उलट याच वक्तव्याचा आधार घेत नाईकांवरच टीका केली आहे.