ठाणे : कोणत्या प्रभागातून उमेदवाराला किती मतदान झाले, याचा सखोल अभ्यास केला जाणार असून त्यानंतरच प्रभागातील संबंधित पदाधिकाऱ्याला आगामी निवडणुकीत उमेदवारी द्यायची की नाही, याचा निर्णय घेतला जाईल. यामुळे महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न करा, अन्यथा तुमच्या उमेदवारीवर गदा येईल, असा स्पष्ट इशारा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी गुरुवारी ठाण्यात घेतलेल्या बैठकीत दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या ठाण्यातील जागेवर भाजपमधील काही नेत्यांसह पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा आहे. त्याची दखल घेऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय संघटनमंत्री बी.एल.संतोष आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या तिन्ही नेत्यांनी पदाधिकाऱ्यांची समजूत काढत नाराज होऊ नका, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी निवडणुकीचे काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यापाठोपाठ भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी गुरुवारी ठाण्यातील भाजप कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

हेही वाचा >>> ठाणे जिल्ह्यात वळिवाच्या सरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाराजी बाजूला ठेवा, कामाला लागा!

आपण सर्वजण महायुतीमध्ये आहोत. महायुती आणि नरेंद्र मोदी यांना पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी आपण काम करायला हवे. त्यामुळे नाराजी बाजूला ठेवा आणि कामाला लागा, असा सल्ला देत त्यांनी पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर केली. यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत. कोणत्या प्रभागातून उमेदरावाला किती मतदान झाले, याचा सविस्तर अभ्यास केला जाणार असून त्यानंतरच आगामी निवडणुकीत तेथील नगरसेवक किंवा इच्छुक पदाधिकाऱ्यांना उमेदवारी द्यायची की नाही, याचा विचार केला जाईल, असा इशारा त्यांनी या वेळी दिला.