ठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघाच्या जागेसाठी महायुतीकडून उमेदवार जाहीर झालेला नसला तरी माजी खासदार व भाजपचे इच्छूक उमेदवार संजीव नाईक यांनी प्रचाराला सुरूवात केली असून त्यापाठोपाठ आता त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्ताने कार्यकर्त्यांना महत्वाच्या सुचना देत केवळ सेवाभावी आणि विधायक उपक्रमांच्या माध्यमातूनच साजरा करण्यास सांगितले आहे. यामुळे संजीव नाईक यांनी आपल्या वाढदिवसांचे औचित्य साधून मतपेरणी सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे.

राज्यातील महायुतीच्या अनेक जागांचे वाटप झालेले असले तरी ठाण्याच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. हा मतदार संघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात येतो. यामुळे शिंदेची शिवसेना या जागेसाठी प्रचंड आग्रही आहे. तर, भाजपही या जागेसाठी आग्रही आहे. या दोन्ही पक्षांच्या दाव्यामुळे जागेचा तिढा कायम आहे. असे असले तरी महायुतीच्या नेत्यांनी मेळाव्यांच्या माध्यमातून प्रचाराला सुरूवात केली आहे. या जागेसाठी शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, माजी आमदार रविंद्र फाटक, आमदार प्रताप सरनाईक यांची तर, भाजपकडून माजी खासदार संजीव नाईक आणि आमदार संजय केळकर यांचे नाव चर्चेत आहेत.

हेही वाचा…डोंबिवलीजवळील निळजे गावात मयत व्यक्तीच्या नावाने जमिनीचा ११ कोटीचा मोबदला लाटला

दरम्यान, उमेदवार जाहीर झालेला नसतानाही भाजपचे इच्छूक उमेदवार संजीव नाईक हे भाजपच्या माध्यमातून जागोजागी मेळावे घेत असून यानिमित्ताने ते ठाणे लोकसभा मतदार संघात पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. मिरा भाईंदर शहरात नरेंद्र मेहता यांनी नाईक यांना पाठींबा देऊन त्यांचा गल्लीबोळात फिरून प्रचार सुरू केला आहे. नाईक यांच्या आक्रमक प्रचारामुळे शिंदेच्या शिवसेनेत अवस्थता पसरली असतानाच, त्यापाठोपाठ आता संजीव नाईक यांनी आपल्या वाढदिवसांचे औचित्य साधून मतपेरणी सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे.

हेही वाचा…ठाणे : मजुरीचे पैसे दिले नाही म्हणून मालकाची चाकू भोसकून हत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार्यकर्त्यांना सुचना

संजीव नाईक यांचा वाढदिवस १५ एप्रिल रोजी आहे. या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी कार्यकर्त्यांना महत्वाच्या सुचना केल्या आहेत. सेवाभावी आणि विधायक उपक्रमांच्या माध्यमातूनच वाढदिवस साजरा करावा, त्याला उत्सवी स्वरुप देऊ नये अशा सुचना त्यांनी दिल्या आहेत. रक्तदान, अन्नदान, आरोग्य तपासणी, समाजातील गुणवंतांचा सत्कार, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, फळवाटप अशा समाजाला उपयुक्त ठरणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करावे. वाढदिवसाचा केक कापू नये. हार, तुरे, पुष्पगुच्छ शुभेच्छांसाठी आणू नयेत. सेवाभावी उपक्रमातून मिळणाऱ्या जनतेच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आपल्यासाठी लाखमोलाचे असल्याचे संजीव गणेश नाईक यांनी म्हटले आहे.