|| नीलेश पानमंद

कपिल पाटील यांना लोकसभेसाठी मदत केल्याची परतफेड मिळणार:- लोकसभा निवडणुकांच्या काही महिने आधी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भिवंडी ग्रामीण पट्टय़ात शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार टक्कर झाली होती. भाजपचे स्थानिक खासदार कपिल पाटील यांनी या भागात शिवसेनेला धक्का देण्यासाठी सर्व प्रकारचे हातखंडे वापरले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पाटील यांनाही धडा शिकवायचा असा चंग येथील शिवसैनिकांनी बांधला होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिष्टाईमुळे येथील शिवसैनिक उशिरा का होईना, पाटील यांच्या प्रचाराला उतरले आणि या मतदारसंघातील चित्र पूर्ण पालटले. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत कपिल पाटील आणि येथील शिवसैनिकांमधील वितुष्ट आता कमी झाले आहे. त्यामुळे युती झाल्यास त्याचा मोठा फायदा या मतदारसंघात शिवसेनेला मिळू शकणार आहे.

भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात कशेळी-काल्हेर, खारबाव, पडघा, अंबाडी तसेच अन्य ग्रामीण परिसराचा समावेश आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने स्वबळावर निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत शिवसेनेचे विद्यमान आमदार शांताराम मोरे आणि भाजपचे उमेदवार शांताराम पाटील यांच्यात प्रमुख लढत झाली होती. अटीतटीच्या लढतीमध्ये शांताराम मोरे विजयी झाले होते. शिवसेनेचे ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून आमदार मोरे हे ओळखले जातात. हा मतदारसंघ राखीव झाल्याने येथून शांताराम मोरे यांना उमेदवारी मिळावी यासाठी पाटील यांचा शब्द निर्णायक मानला गेला. मोरे यांच्या विजयातही पाटील यांचा मोठा वाटा राहिला. या निवडणुकीनंतर ठाणे जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडली. त्यामध्ये ५३ जागांपैकी शिवसेनेने २६, तर भाजपने १६ जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी भिवंडीतील २१ जागांपैकी शिवसेनेने १० तर भाजपने ७ जागा जिंकल्या होत्या. या ठिकाणी शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. या निकालाच्या आधारे भिवंडीतील शिवसेनेच्या नेत्यांनी लोकसभेच्या जागेवर दावा केला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीत युती झाल्यानंतर ही जागा भाजपला देण्यात आली. या निवडणुकीत खासदार कपिल पाटील हे निवडून आले. त्यामुळे भिवंडी ग्रामीण मतदारसंघात युतीची ताकद वाढल्याचे चित्र आहे. युतीसाठी जिल्ह्य़ातील हा सुरक्षित मतदारसंघ असल्याचे बोलले जात आहे. मात्र युती झाली नाही तर दोन्ही पक्षांमध्येच पुन्हा अटीतटीची लढत होऊ शकते.

प्रमुख समस्या..

भिवंडी ग्रामीण परिसरात मोठय़ा प्रमाणात गोदामे असून त्या ठिकाणी विविध कंपन्यांच्या मालाची साठवणूक करण्यात येते. त्यामुळे या भागात मोठय़ा प्रमाणात अवजड वाहतूक होत असून या वाहतुकीमुळे येथे कोंडीची मोठी समस्या निर्माण होते.

भिवंडी ग्रामीण भागातील कशेळी ते पूर्णा, भिवंडी-वाडा आणि अन्य रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

भिवंडी ग्रामीण भागात टोरेंटो कंपनीमार्फत वीजपुरवठा करण्यात येतो. या कंपनीचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत असून ही कंपनी हटवून महावितरणमार्फत वीजपुरवठा करण्याची मागणी नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत. नागरिकांची ही मागणी प्रलंबितच आहे.

मतदार काय म्हणतात

भिवंडी ग्रामीण परिसरात सध्या २५० गावे असून या गावांमध्ये टोरंट कंपनीतर्फे विद्युतपुरवठा करण्यात येतो. कंपनीच्या मनमानी कारभाराला नागरिक कंटाळले आहेत. येथे कोणतीही पूर्वसूचना न देता विद्युतपुरवठा खंडित केला जातो.  – सर्वेश तरे,  कलाकार, काल्हेर

भिवंडी ग्रामीण मतदारसंघामध्ये आमदारांनी रस्ते, वीज, पाणी, व्यायामशाळा, शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधांचा दर्जा सुधारण्याबाबत आश्वासने दिली होती. मात्र, ती आश्वासने कागदावरच आहेत. त्यामुळे येथील नागरिकांची फार गैरसोय होत आहे. उच्च पदवीचे महाविद्यालय नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी दुसऱ्या शहरांत यावे लागत आहे. – कल्पेश शेलार, कंपनी व्यवस्थापक 

भिवंडी ग्रामीण मतदारसंघामध्ये एमएमआरडीए, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान ग्राम योजनेतून कामे केली आहेत. पाणी योजनेसाठीही कामे केली आहेत. खारबाव आणि मालोडी या भागातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी चिंधीपाडा येथे धरण प्रस्तावित आहे. – शांताराम मोरे, आमदार, भिवंडी ग्रामीण