डोंबिवली – ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या नागरी समस्या, तक्रारी आणि इतर प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवलीत, बुधवारी (ता.२०) जनता दरबाराचे सकाळी दहा ते दुपारी चार वेळेत आयोजन करण्यात आले आहे. या जनता दरबारात प्रदेशाध्यक्षांचे स्वीय साहाय्यक संतोष साखरे नागरिकांची निवेदने स्वीकारणार आहेत, तरी डोंबिवली, कल्याणसह ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी या उपक्रमात आपले नागरी समस्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन भाजप कल्याण जिल्ह्याचे अध्यक्ष नंदू परब यांनी केले आहे.
भाजपचा जनता दरबार डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसी निवासी भागातील गोखले रुग्णालयाजवळील गणेश मंदिर भागातील भाजप कल्याण ग्रामीण कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावतीने नागरिकांची निवेदने स्वीय साहाय्यक साखरे स्वीकारणार आहेत. डोंबिवली, कल्याण शहर परिसरातील नागरिकांनी आपली निवेदने स्थानिक भाजप पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांना दिली तरी ही निवेदने प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यापर्यंत मार्गी लावण्यासाठी पोहचविण्यात येणार आहेत, असे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी सांगितले.
भाजप प्रदेशाध्यक्षांचा डोंबिवलीत होणारा हा पहिलाच जनता दरबार आहे. गेल्या काही दिवसापूर्वी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी विकास हवा असेल तर कल्याण डोंबिवली पालिकेवर भाजपचा महापौर बसला पाहिजे आणि कल्याण, डोंबिवली परिसर भाजपमय करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जनता दरबाराच्या माध्यमातून लोकांचे नागरी समस्या आणि इतर प्रश्न मार्गी लावून लोकांशी जवळिक साधण्याचा प्रयत्न भाजपकडून या माध्यमातून केला जात असल्याची चर्चा आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर नागरिकांचे नागरी समस्या, विकासाचे प्रश्न मार्गी लावले तर हा विषय भाजपला पालिका निवडणूक प्रचार कार्यक्रमात वापरता येणार आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण राज्याच्या विविध भागात पक्षाचे, नागरिकांचे मेळावे घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मग, त्यांनी आपल्या मूळ शहरातही अशाच प्रकारचा मेळावा किंवा जनता दरबार घेऊन नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी शहरातील विविध स्तरातील नागरिक, भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती. या मागणीचा विचार करून हा जनता दरबार सुरू करण्याच आल्याची चर्चा भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे. आगामी पालिका निवडणुकीत कल्याण डोंबिवली शहरात जोरदार मुसंडी मारण्यासाठी भाजपने जोरदार व्यूहरचना आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जनता दरबारसारखे उपक्रम भाजपने शहरात राबविण्यास सुरूवात केल्याची चर्चा आहे.