ठाणे : वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे ठाणे विभागाची जबाबदारी सोपवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचणाऱ्या भाजपने डॉ. श्रीकांत शिंदे यांचे एकेकाळचे निकटवर्तीय डोंबिवलीचे दीपेश म्हात्रे यांना पक्षात प्रवेश दिला. यामुळे ठाण्यापाठोपाठ कल्याण, डोंबिवलीतही शिंदेसेनेला आव्हान उभे राहील, या दिशेने भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली.
दीपेश यांचा भाजप प्रवेश होत असताना एकनाथ शिंदे यांनी कल्याण पूर्वेत भाजपचे कडवे विरोधक महेश गायकवाड यांना मुंबईतील निवासस्थानी बोलावून घेत त्यांच्याकडे पक्षाच्या विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली.
महापालिका निवडणुकांपूर्वी या दोन्ही पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर कुरघोडी सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करताच डोंबिवलीचे दीपेश म्हात्रे हेदेखील त्यांच्याबरोबर राहिले. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून दीपेश ओळखले जात. दीपेश यांचे वडील पुंडलिक म्हात्रे हे कल्याण डोंबिवलीचे माजी महापौर होते. दीपेश यांना विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा होती. मात्र डोंबिवली विधानसभा मतदारसंघ रवींद्र चव्हाण यांच्याकडे असल्याने महायुतीच्या गणितात दीपेश यांना उमेदवारी मिळणे कठीण बनले. त्यामुळे निवडणुकांच्या काळात दीपेश पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे परतले.
डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आदेश एरवी शिरसावंद्या मानणारे दीपेश अचानक उद्धव गटाकडे परतल्याने भाजपमध्येही अस्वस्थता होती. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरही उद्धव यांनी दीपेश यांच्याकडे पक्षाचे जिल्हाप्रमुख पद सोपविले होते. मात्र दीपेश यांनी जेमतेम वर्षभरातच मातोश्रीला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. विशेष म्हणजे, दीपेश यांचा कल शिंदेसेनेच्या दिशेने असेल अशी चर्चा असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि स्थानिक आमदार रविंद्र चव्हाण यांनी त्यांना भाजपकडे वळवून आगामी महापालिका निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांच्यापुढेच आव्हान उभे केल्याचे दिसते. या निवडणुकीत युती झालीच तरी निवडणूकपूर्व वाटाघाटींमध्ये भाजप उजवा ठरावा अशापद्धतीची ही रणनिती असून शिंदे गटाशी दोन हात करावे लागलेच तर दीपेश यांचा पुरेपूर वापर करता येईल अशी आाखणी चव्हाण यांनी यानिमित्ताने केली आहे.
महेश गायकवाड यांना पद
कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिंदेसेनेचे पदाधिकारी महेश गायकवाड हे कडवे भाजपविरोधक मानले जातात. या भागातील भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यातच महेश यांच्यावर केलेल्या गोळीबाराचे प्रकरण गाजले होते. गायकवाड यांच्या पत्नी आणि आमदार सुलभा यांच्याविरोधात महेश यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. त्यावेळी खासदार शिंदे यांचे बहुसंख्य समर्थक महेश यांच्याबरोबर होते. दीपेश यांचा भाजप प्रवेश नक्की होत असताना शिंदे यांनी महेश यांना मुंबईत बोलावून घेतले आणि त्यांना पक्षाचे विधानसभा अध्यक्षपद देऊ केले. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाची अवस्था बिकट असताना याठिकाणी भाजप आणि शिंदेसेनेत कुरघोडीच्या राजकारणाने टोक गाठल्याचे चित्र यानिमित्ताने पुढे आले आहे.
