ठाणे : येत्या काही महिन्यात ठाणे महापालिकेची निवडणुक होणार असून या निवडणुकीत महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वबळाचा नारा देण्यास सुरूवात केली आहे. पालिका निवडणुक लढण्यासाठी इच्छूक असलेल्या कार्यकर्त्यांसाठी भाजपने शिबीराचे आयोजन केले होते. त्यात कार्यकर्त्यांनी स्वबळाचा नारा देत ‘अब की बार ७० पार’ ची घोषणा दिली. यामुळे दोन्ही मित्र पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे.
ठाणे भाजपकडून गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मार्गदर्शन शिबीरात पक्षाने आगामी निवडणुकीसाठीची ताकद दाखवली. ठाणे शहरातील १८ मंडळांतून तब्बल ४१६ इच्छुक उमेदवारांनी या शिबीरात सहभाग नोंदवला. या शिबीरात आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, शहराध्यक्ष संदीप लेले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यात उमेदवारांना संघटन, प्रचारतंत्र आणि मतदारांशी संवाद साधण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या माध्यमातून ठाणे भाजपने स्वबळाची तयारी सुरु केल्याची चर्चा असतानाच, कार्यकर्त्यांनी स्वबळाचा नारा देत ‘अब की बार ७० पार’ ची घोषणा दिली.
या शिबीराच्या एक दिवस आधी म्हणजेच बुधवारी सायंकाळी ठाण्यातील आनंद आश्रम येथे शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक आणि आगामी निवडणुकीच्या पूर्वतयारीसंदर्भात महत्वाची बैठकपार पडली. या बैठकीत महायुतीमधील भाजपबाबत नाराजीचा सूर उमटला. ठाण्यात शिवसेनेच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांकडून होत असलेल्या विकासकामांमध्ये भाजपचे काही पदाधिकारी अडथळे आणत असल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी व्यक्त केल्या. अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी आगामी ठाणे महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची मागणी बैठकीत केली. दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून ठाणे पालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची मागणी होत असल्याचे दिसून येत असून यावर वरिष्ठ काय भुमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
युतीच्या निर्णयाचा तसा काहीच संबंध नाही
पक्ष संघटना म्हणून आम्ही काम करत आहोत. निवडणुकांबाबत प्रत्येक कार्यकर्त्यांची अपेक्षा असते. इच्छूक उमेदवारांबाबत जाणून घेऊन त्यांचे परिचय पत्र घेणे ही एक स्वाभाविक प्रक्रीया आहे. युती नको किंवा हवी असे कार्यकर्ते सांगत असले तरी याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येतो. त्यामुळे आजच्या शिबीरात ‘अब की बार ७० पार’ ची घोषणा देण्यात आल्या असल्या तरी, या शिबीराचा आणि युतीच्या निर्णयाचा तसा काहीच संबंध नाही, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी स्पष्ट केले.
ठाणे महापालिकेत एकूण ३३ प्रभाग असून त्यातून १३१ नगरसेवक निवडून जाणार आहेत. मागील म्हणजेच 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे स्वतंत्र लढले होते. या निवडणुकीत भाजपाने एकूण २३ जागा जिंकल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांकडून स्वबळाचा नारा देण्यात येत असून या कार्यकर्त्यांनी १३१ पैकी ७० जागा जिंकण्याचा चंग बांधला आहे. यातूनच शिबिरामध्ये आपकी बार सत्तर पार अशी घोषणा देण्यात आली आहे.