ग्रामीण भागातही आता वाचन संस्कृतीचा प्रसार होताना दिसत आहे. पालघर जिल्ह्य़ातील विक्रमगड तालुक्यातील कावळे आदिवासी पाडय़ाने पुस्तकांचा मळाच भरवला आहे. बालवाचनालयासह सुसज्ज असे ग्रंथालय त्या ठिकाणी उभारले आहे. पालघर जिल्ह्य़ातील अवघ्या १३०० कातकरी आणि वारली समाजाची वस्ती असलेल्या या पाडय़ामध्ये पदवीधरांची संख्या मोठी आहे, यामध्ये डॉक्टर, इंजिनीअर, कृषीतज्ज्ञ, शासकीय कर्मचारी, बँक कर्मचारी, वकिलांचाही समावेश आहे.
 या विभागातील मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि वाचन संस्कृतीचा वसा चालविण्यासाठी शंकर महाले या शिक्षकाने १०० पुस्तके वाचनालयास भेट दिली आहेत. येथे वाचनालयासाठी पक्की इमारतही उपलब्ध आहे. मुलांना पोषक आहाराबरोबरच पुस्तकांचा सकस उपहार देणे गरजेचे असून, या उपक्रमामुळे पुस्तके ही जीवनावश्यक वस्तू असल्याचे त्यांच्या मनावर बालपणीच ठसेल, असे मनोगत आश्रमशाळेचे मुख्याध्यापक डी. पी. सावंत यांनी व्यक्त केले. सुट्टी संपल्यानंतर हे बालवाचनालय जिल्हा परिषद व आश्रम शाळेला जोडण्यात येणार असून, दररोज एक तास वाचनालयासाठी देण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.
* नवदृष्टी संस्थेचे डॉ. नागेश टेकाळे यांनी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर येथे बालवाचनालय सुरू केले.
* व्यास क्रिएशनने प्रकाशित केलेला दोनशे पुस्तकांचा बाल खजिना संच हा सध्या येथील लहान मुलांसाठी नवलाई ठरली आहे.
* रंगीत पुस्तकांच्या या बालमेव्याचा सध्या येथील २५ हून अधिक मुले लाभ घेत आहेत.
* या पुस्तकांवर आधारित विविध स्पर्धा आयोजित करून त्यात यशस्वी ठरणाऱ्या मुलांना पुरस्कार देण्यात येणार आहेत.
* कावळे पाडय़ाच्या आजूबाजूला असलेल्या पडवी, रडे आणि पोटखल या तीन आदिवासी पाडय़ांतील मुलेही या बालवाचनालयाचा लाभ घेत आहेत.
* छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक ग्रंथालयात ७०० विविध पुस्तकांचा संग्रह असून, चार साप्ताहिके आणि डझनभर वृत्तपत्रांनी वाचनालय गजबजलेले आहे. दररोज १०० वाचक त्याचा लाभ घेत आहेत.