शिवाजी सोनावणे चित्रकार, मूर्तिकार, लेखक
शिवाजी सोनावणे हे वसईतील प्रसिद्ध चित्रकार, मूर्तिकार, लेखक, कवी आणि वक्ते आहेत. त्यांची आजवर ‘सांस्कृतिक बौद्ध कलाविष्कार’, ‘सोपारा बौद्ध संस्कृतीचे केंद्र’ ही पुस्तके आणि ‘क्षितिजाकडे’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाली आहेत. सोनावणे यांची आतापर्यंत १००च्यावर चित्रप्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्रात झाली आहेत. नुकतेच दुबई येथे त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन झाले. अनेक पुरस्कार, सन्मान त्यांना मिळालेले आहेत.
खानदेशातील धुळे येथे माझे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाले. त्या काळात वस्तिगृहात राहत होतो. तेथील ग्रंथालयातील लहान मोठी पुस्तके वाचली. माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चित्रकलेची आवड असल्यामुळे पुण्यात चित्रकलेचा अभ्यास पूर्ण केला. चित्रकलेचे पुढील शिक्षण घेण्याच्या दृष्टीने मुंबईत नोकरी करून जी. डी. आर्ट ही पदवी संपादन केली. कलाशिक्षण घेत असताना तेथील ग्रंथालयातील अनेक विषयांची पुस्तके सतत वाचनात आली. त्यात कला संदर्भातील ग्रंथ, धार्मिक, ऐतिहासिक ज्ञानकोशातील कला व इतिहासाशी संबंध वाचून त्यांच्या नोंदी केल्या. त्यांचा मला वृत्तपत्रीय लेखनासाठी उपयोग झाला. शिक्षक असल्याने वाचनाचा नाद सतत वाढतच राहिला आणि आजही तसाच आहे.
विद्यार्थीदशेत असताना कथा-कादंबऱ्या यांची विशेष गोडी लागली नाही; परंतु धार्मिक कलेशी संबंधित, ऐतिहासिक ग्रंथाच्या वाचनाबरोबर थोर पुरुषांची चरित्रेही वाचली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्राचे चार खंड मी वाचले आणि त्याने मी प्रभावित झालो. पुढे आंबेडकरांची, बौद्धधम्म व हिंदू धर्माची अनेक पुस्तके वाचली. त्यांचा संग्रह आजही माझ्याकडे आहे. चित्रकार व शिल्पकारांच्या चरित्राचे वाचन मी केले असून प्राचीन भारत, मध्ययुगातील भारत यासंबंधी ग्रंथ संग्रहित केलेले आहेत. दलित साहित्यापैकी बाबुराव बागुल, दया पवार, भीमसेन देठे, रावसाहेब कसवे, नारायण सुर्वे, यशवंत मनोहर या लेखकांचे साहित्य वाचले आहेत. दृक्कला, भारतीय दृक्कलेचा इतिहास, मंडळ रचना, शालेय चित्रकला, कला दर्शन, भारतीय चित्रकार इत्यादी ग्रंथांचा अभ्यास मी केला आहे. त्यामुळे आपणही कलेशी संबंधित ग्रंथ लिहावा या उद्देशाने ‘सांस्कृतिक बौद्ध कलाविष्कार’ हे पुस्तक लिहिले. सोपारा या वसई तालुक्यातील महत्त्वाच्या अशा ऐतिहासिक स्थळाचा अनेक वर्षे अभ्यास करून ‘सोपारा बौद्ध संस्कृतीचे केंद्र’ हे पुस्तक लिहिले.
ग्रंथवाचनबरोबर कवितासंग्रहही अनेक वाचले आहेत. अनेक कवी-मित्रांच्या सहवासामुळे गेली ३० ते ४० वर्षे कविता लिहीत आहे. मित्रांच्या आग्रहामुळे ‘क्षितिजाकडे’ हा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे. पुस्तकाच्या वाचनामुळे मी विद्यार्थ्यांना प्रभावीपणे शिकवू शकलो. पुस्तकाच्या वाचनामुळेच मी चित्रकार, मूर्तिकार, लेखक, कवी झालो. माझी तीन पुस्तके प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहेत. डॉ. दाऊद दळवी यांचे ‘लेणी महाराष्ट्राची’, राहुल सांस्कृत्यायन यांचे ‘बुधाचार्य’, अरुण वैद्य यांचे ‘कला कौस्तुभ’, धनंजय कीर यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, शांताराम भालचंद्र देव यांचे ‘महाराष्ट्राचा इतिहास’, डॉ. सिंधू डांगे यांचे ‘बौद्ध धर्म आणि तत्त्वज्ञान’, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे ‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास’, ‘अस्पृश्य मूळचे कोण?’ ही सर्व पुस्तके माझ्या वाचनात आली असून यांचा संग्रह माझ्याकडे आहे.
कोणतेही नवीन अथवा जुने पुस्तक वाचनात आल्यावर सर्वप्रथम मी त्या पुस्तकाची प्रस्तावना प्रथम वाचतो. पुस्तक वाचनासाठी काळ, वेळ, स्थळ याचे मला बंधन नाही. रेल्वेने प्रवास करताना पुस्तक माझ्या सोबत असतेच तर निवृत्तीनंतर बहुधा घरीच वाचन होते. तर वृत्तपत्र वाचणे, चित्र काढणे, मूर्ती तयार करण आणि पुस्तके वाचणे यामध्येच मी माझा संपूर्ण दिवस घालवतो. माझ्या कपाटामध्ये चित्रकला-शिल्पकला संबंधी ग्रंथ, हिंदू व जैन, बौद्धधर्म ऐतिहासिक संदर्भग्रंथ, हिंदी-मराठी साहित्य, समीक्षा ग्रंथ, काव्यसंग्रह असे दीड हजाराहून जास्त ग्रंथ संग्रहित आहेत. पुस्तक म्हणजे व्यक्तिगत माझ्यासाठी सच्चा मित्र, प्रत्यक्षातील मित्रांची संख्या मोजकी असल्यामुळे हजारो ग्रंथ हे माझे मित्र झाले आहेत. सेवानिवृत्तीनंतर तर ते अधिक जवळ आले. नवीन पुस्तक वाचून झाल्यावर एका नव्या मित्राच्या भेटीचा आनंद मला लाभतो. माझ्याकडे येणाऱ्या विद्यर्थ्यांना, मित्रांना, नातलगांना माझे ग्रंथालय दाखवण्याचा मोह आजही टाळता येत नाही.