डोंबिवली – डोंबिवली जवळील ९० फुटी रस्त्यावरील कचोरे गावाजवळील खाडी किनारा भागात आई सागरदेवी स्थानापासून काही अंतरावर विष्णुनगर पोलिसांना एका अज्ञात प्राण्याची निर्घृण हत्या केल्याचे आढळून आले आहे. पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून पोलिसांनी घटनास्थळी आढळेला मांसाचा तुकडा फोरेन्सिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविला आहे. यावरून कोणत्या प्राण्याची हत्या झाली हे निष्पन्न होणार आहे.

कचोरे खाडी किनारी भागात गेल्या आठवड्यात संध्याकाळच्या वेळेत बाह्य वळण रस्त्याच्या कच्च्यावर मार्गावर विष्णुनगर पोलीस ठाण्याचे हवालदार शशिकांत रायसिंग आणि हवालदार मोरे दुचाकीवरून गस्त घालत होते. ते पत्रीपूल बाजारपेठ विभागाकडे जात असताना त्यांना कचोरे गाव हद्दीतील आई सागरदेवी स्थळापासून काही अंतरावर गवतावर रक्त सांडल्याचे दिसले आणि तेथे एका प्राण्याच्या जठराचा तुकडा पडलेला आढळला. या भागात कत्तलखाना नसताना या भागात कोणत्या तरी अज्ञात प्राण्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. याची जाणीव झाल्यावर हवालदार रायसिंग यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना दिली. ही माहिती मिळताच वरिष्ठांच्या आदेशावरून पोलीस उपनिरीक्षक अनिल शिनकर, उपनिरीक्षक दाभाडे घटनास्थळी आले. त्यांनी घटना घडलेल्या जागेची पाहणी केली. त्यांना रात्रीच्या वेळेत या भागात एका अज्ञात प्राण्याची निर्घृण हत्या केल्याचे आढळले. प्राण्याची ओळख पटली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही माहिती वरिष्ठ निरीक्षक पवार यांनी कल्याण येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली. त्यांच्या सूचनेवरून घटनास्थळी सापडलेला मांसाच्या तुकड्यातील काही भाग काढून तो अधिक तपासणीसाठी फोरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. या तपासणीनंतर घटनास्थळी कोणत्या प्राण्याची हत्या केली ते निष्पन्न होणार आहे. पोलिसांनी याप्रकरणी प्राणी अत्याचार प्रतिबंधक कायद्याने अज्ञात इसमा विरुध्द गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.