डोंबिवली शहराच्या विविध भागात गेल्या काही महिन्यापासून घरफोड्या करणाऱ्या एका सराईत घरफोड्याला मानपाडा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने अंबरनाथ तालुक्यातील व्दारली गावातून अटक केली आहे. त्याने मानपाडा, रामनगर, विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीत एकूण १० चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून चोरीचा १२ लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी येथे दिली. शंकर भिमराव सूर्यवंशी उर्फ धोत्रे उर्फ बेनाळे (२६) असे आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा >>> ठाणे : जैवविविधता उद्यानात आग ; बांबूच्या झाडाचे नुकसान

गेल्या वर्षापासून डोंबिवली शहराच्या विविध भागात दिवसा, रात्री घरफोड्यांचे प्रमाण वाढले होते. नोकरदार वर्ग सकाळी कामावर गेला की त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरातील लाखो रुपयांचा ऐवज चोरुन नेला जात होता. मे महिन्याच्या सुट्टीत रहिवासी गावी जातात. या कालावधीत या घरफोड्या वाढण्याची शक्यता विचारात घेऊन अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, उपायुक्त गुंजाळ, साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांना घरफोड्या करणाऱ्या चोरट्याला पकडण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना केल्या होत्या.

हेही वाचा >>> बदलापूर : सलग दुसऱ्या आठवड्यात वणवा सत्र; समाजकंटांनी वणवा लावल्याचा संशय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मानपाडा पोलीसांचे विशेष तपास पथक घरफोडी प्रकरणाची चौकशी करताना त्या भागातील सीसीटीव्ही चित्रण, त्यामधील चोरटा याची पडताळणी करत होते. त्यांना एक ठराविक इसम या चोऱ्या करत असल्याचे दिसत होते. या आरोपीचा माग काढणे पोलिसांसमोर आव्हान होते. सीसीटीव्ही चित्रण, तांत्रिक माहितीच्या आधारे घरफोड्या करणारा हा २७ गावातील व्दारली गावात ओमसाई चाळीत राहत असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या भागात पाळत ठेऊन सोमवारी शंकर सूर्यवंशीला अटक केली. त्याने मानपाडा हद्दीत सहा, विष्णुनगर हद्दीत तीन, रामनगर पोलीस ठाणे हद्दीत एक गुन्हा केला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे, सुनील तारमळे, साहाय्यक उपनिरीक्षक भानुदास काटकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.