डोंबिवली : टिटवाळा येथून येणारा बाह्यवळण मार्ग डोंबिवलीतील आयरे भागातील हरितपट्टा परिसरातून जाणार असून हा एक किलो मीटर लांबीचा रस्ता पालिकेच्या विकास आराखड्यात प्रस्तावित करण्यात आलेला आहे. या रस्त्यावर बेकायदा चाळी, इमारती होत असून त्याकडे पालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे बाह्यवळण रस्त्याचा आयरे, भोपर, नांदिवली पंचानंद भागातील टप्पा अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. 

टिटवाळा, कल्याणमधील गांधारे, वाडेघर, पत्रीपूल, डोंबिवलीत गणेशनगर, कुंभारखाणपाडा, देवीचापाडा, मोठागाव भागातून २१ किलोमीटर लांबीचा बाह्यवळण रस्ता कोपर, आयरे, भोपर, नांदिवली पंचानंद, काटई, हेदुटपणेपर्यंत प्रस्तावित आहे. या रस्त्याचा टिटवाळा ते दुर्गाडी टप्पा पूर्ण झाला आहे. या रस्त्यामधील दुर्गाडी ते मोठागाव रेतीबंदर हा ५६१ कोटीचा महत्वपूर्ण टप्पा एमएमआरडीएने हाती घेतला आहे. येत्या दीड वर्षात हे काम प्राधिकरणाकडून पूर्ण केले जाणार आहे. या टप्प्यानंतर मोठागाव, कोपर, आयरे, नांदिवली, काटई ते हेदुटणे या महत्वपूर्ण वळण रस्त्याचे काम प्राधिकरणाकडून हाती घेतले जाणार आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील आयरे गाव, कोपर पूर्व मधील ४४ एकरचा हरितपट्टा बेकायदा बांधकामांच्या विळख्यात

या रस्त्यासाठी पालिकेने भूसंपादन करुन ती जमीन एमएमआरडीएकडे हस्तांतरित करायची आहे. त्यानंतर प्राधिकरण या रस्ते कामाच्या निविदा काढते. १०० टक्के भूसंपादन पालिकेकडून झाले नसेल तर त्या कामाची निविदा मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण काढत नाही. या धोरणामुळे दुर्गाडी ते मोठागाव वळण रस्त्याचा सहा किमीचा टप्पा मागील दोन वर्ष रखडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उर्वरित भूसंपादन लवकर करा असे पालिकेला सांगून या कामाची प्रक्रिया सुरू करुन दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रस्ते मार्गात बंगले

हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर कोपर पश्चिम,पूर्व रेल्वे स्थानक, आयरे गाव, भोपर भागातून जाणाऱ्या तीन किमी लांबीच्या वळण मार्गातील बेकायदा चाळी, बेकायदा इमारती, बंगले प्रशासन कधी तोडणार. आयरे गाव हद्दीत एक किमीचा रस्ते पट्टा बेकायदा चाळी बांधून हडप करण्यात आला आहे. भोपर येथे काही राजकीय मंडळींची बंगले वळण रस्ता मार्गात आहेत. आयरे गाव हद्दीत बेसुमार बेकायदा बांधकामे सुरू असताना गेल्या वर्षभरात या भागाच्या नियंत्रक पालिकेच्या ग प्रभागाने या भागातील एकाही भूमाफियाला नोटीस काढली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. माणकोली पूल मे मध्ये सुरू झाल्यानंतर बाह्य वळण रस्ता वाहतूक विभाजनात महत्वाची भूमिका बजावणार आहे. असे असताना आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे या महत्वपूर्ण रस्त्यामधील बेकायदा बांधकामांच्या विळख्यात अडकलेल्या रस्त्याविषयी आक्रमक भूमिका घेत नसल्याने शहरातील नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.  

  • यापूर्वी आयरे भागात बेकायदा बांधकामांना काही नोटिसा पाठविल्या असतील याविषयी माहिती नाही. नव्याने एकही नोटीस कोणाला काढली नाही” अशी उत्तरे ग प्रभागाचे अधिकारी देत असल्याने ते आयरे भागातील बेकायदा बांधकामांचे संरक्षण करण्यासाठी कार्यालयात बसले आहेत का, असा प्रश्न या प्रकरणातील याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी केला आहे.