कल्याण – पश्चिमेतील एका चाळीतील खोलीमध्ये वर्षभरापूर्वी एका ७५ वर्षांच्या वृद्धेची हत्या झाली होती. इमारत पुनर्विकासासाठी चाळीतील खोली देण्यास तयार नसल्यामुळे तिची हत्या केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला होता. याप्रकरणी शनिवारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशावरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात घर मालक आणि त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वहिदा बी नूरमहम्मद शेख (७५, रा. गुलजार टांगेवाली चाळ, मलिक कम्पाऊंड, वल्लीपीर रोड, कल्याण पश्चिम) असे खून झालेल्या वृद्धेचे नाव आहे. टांगेवाली चाळीचा मालक अब्दुल समद मलिक, पत्नी शेहनाज मलिक, मुलगा अरबाज यांनी संगनमत, कट रचून वहिदा यांची हत्या केल्याची तक्रार वहिदा यांचा पुतण्या अब्दुला नुरमोहम्मद पटणी (५३, रा. गरीब नवाज इमारत, दत्तुवाडी, मुंब्रा) यांनी केली आहे. त्यानुसार या तिघांविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – ज्येष्ठ रंगकर्मी विजय साळवी कालवश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वहिदा या ४० वर्षांपासून कल्याण पश्चिमेतील वल्लीपीर रस्त्यावरील गुलजार टांगेवाली चाळीत भाडेकरू म्हणून राहत होत्या. त्यांच्या पतीचे कर्करोगाने निधन झाल्याने त्या खोलीत एकट्याच राहत होत्या. त्यांना एक विवाहित मुलगी आहे. गुलजार चाळीचा पुनर्विकास करायचा असल्याने चाळ मालक अब्दुल मलिक त्यांना गेल्या वर्षाीपासून सतत घर खाली करण्यासाठी तगादा लावत होता. तसेच ४० हजार रुपये देण्याची मागणी करत होता. या वयात घर खाली करून नवीन जागेत कोठे जायचे या विचारामुळे त्या घर खाली करण्यास नकार देत होत्या. त्याचा राग मालक अब्दुल मलिक यांना होता.

हेही वाचा – ठाणे : काँग्रेस, राष्ट्रवादी धर्मनिरपेक्ष आहेत का ? असदुद्दीन ओवेसी यांचा सवाल

मुंब्रा भागात राहणारा पुतण्या अब्दुला पटनी हा वहिदा यांना नियमित भेटण्यासाठी कल्याण येथे येत होता. गेल्या वर्षी मे महिन्यात तो असाच वहिदा यांना भेटून गेल्यानंतर तिसऱ्याच दिवशी वहिदा यांची राहत्या घरात हत्या झाली होती. वहिदा यांची प्रकृती ठणठणीत असताना त्यांची हत्या कोणी केली, असा प्रश्न निर्माण झाला होता. बाजारपेठ पोलिसांनी रुक्मिणीबाई रुग्णालयात वहिदा यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले होते आणि त्यानंतर वहिदा यांच्या मृतदेहाचे दफन नातेवाईकांनी केले होते. या नंतर अब्दुला पटणी हे गुलजार चाळीत गेले. तेव्हा चाळ मालक अब्दुल मलिक हे वहिदाच्या घराच्या चाव्या मागू लागला. घराचा ताबा बेकायदा अब्दुल मलिक यांनी घेतला होता. वहिदा यांची हत्या केल्याचा संशय चाळ मालक अब्दुलवर व्यक्त करत पटणी यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. वहिदाच्या मृत्यूला चाळ मालक अब्दुल मलिक जबाबदार असल्याचा आरोप करत पटणी यांनी कल्याण न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने सर्व बाजू तपासून चाळ मालक आणि त्याच्या कुटुंबियांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश बाजारपेठ पोलिसांना दिले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case against house owner for murder of old women in kalyan ssb
First published on: 26-02-2023 at 14:15 IST