लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: एका तरुणी बरोबर साखरपुडा करुन तिच्या बरोबर लग्न करण्याच्या आणाभाका घेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. ऐनवेळी दुसऱ्याच तरुणी बरोबर विवाह करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी कायद्याचा बडगा दाखविला. विवाहाच्या बोहल्यावर चढलेल्या नवरदेवाची पोलिसांनी मंडपातून पोलीस ठाण्यापर्यंत वरात काढली.
सिध्दार्थ दिलीप शिंदे असे आरोपी नवरदेवाचे नाव आहे. तो वडील दिलीप शिंदे, आई शांता यांच्यासह गणेशनगर मधील राजवैभव ॲनेक्स गृहसंकुलात राहतो. पोलिसांनी डोंबिवलीतील मोठागाव मधील साखरपुडा झालेल्या तरुणीच्या तक्रारीवरुन सिध्दार्थ आणि त्याच्या आई, वडिलांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
आणखी वाचा- दुचाकीवर रिल्स करणे पडले महागात, तरूण-तरूणीवर गुन्हा दाखल
पोलिसांनी सांगितले, पाच वर्षापूर्वी आरोपी सिध्दार्थ याची ओळख एका तरुणीशी झाली. त्याने तिच्या बरोबर विवाह करण्याची मागणी केली. आई, वडिलांच्या संमतीने सिध्दार्थने या तरुणी बरोबर साखरपुडा केला. दरम्यानच्या काळात सिध्दार्थने या तरुणी बरोबर शारीरिक संबंध केले. या तरुणीचा विश्वास संपादन करुन तिच्याकडून एक लाख रुपये उकळले. आपण विवाह बंधनात अडकणार आहोत. त्यामुळे सिध्दार्थ आपल्याला फसविल असे तरुणीला वाटले नाही.
दरम्यानच्या काळात सिध्दार्थ संबंधित तरुणीला टाळू लागला. त्याने दुसऱ्या एका तरुणी बरोबर विवाहाची बोलणी केली. तिच्या बरोबर विवाह केला. ही माहिती पहिल्या तरुणीला समजताच तिने विष्णुनगर पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांना घडल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने सिध्दार्थला विवाहाच्या बोहल्यावरुन ताब्यात घेऊन त्याला पोलीस ठाण्यात आणले. त्याच्या आई वडिलांचा पोलीस शोध घेत आहेत.तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेऊन तिची फसवणूक केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.