कल्याण – रुग्ण सेवेचे कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र जवळ नसताना कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील माणेरे गाव हद्दीत साई क्लिनिक दवाखाना चालविणाऱ्या कल्याण, उल्हासनगरमधील चार डाॅक्टरांच्या विरुध्द एका डाॅक्टरच्या तक्रारीवरून, उल्हासनगर न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली पालिकेने या दवाखान्याची तपासणी केल्यावर दिशाभूल करणारे अहवाल देऊन या डाॅक्टरांची पाठराखण केली. अखेर तक्रारदार डाॅक्टरने उल्हासनगर न्यायालयात दावा दाखल केला. न्यायालयाच्या आदेशावरून पोलिसांनी या चार डाॅक्टरांवर गुन्हे दाखल केले.
डाॅ. चंदर रोहरा, डाॅ. अरूण भाकरे, डाॅ. सुरेश मुरलीधर पिलारे आणि डाॅ. श्रीकृष्ण तुकाराम कुमावत अशी गुन्हा दाखल असलेल्या डाॅक्टरांची नावे आहेत. उल्हासनगरमधील एक जागरूक डाॅक्टर राकेश अरूण गाजरे यांनी या डाॅक्टरांच्या विरुध्द शासन, कल्याण डोंबिवली पालिकेकडे अनेक तक्रारी केल्या होत्या. २०१८ पासून या चारही डाॅक्टरांच्या तक्रारी ते कल्याण डोंबिवली पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकडे करत होते.
पालिकेच्या आरोग्य विभागातील समाज विकास अधिकारी प्रशांत गवाणकर, रुपेश हिंदुराव या तक्रारींची चौकशी करून उलटसुलट, दिशाभूल करणारी माहिती तयार करून या डाॅक्टरांची पाठराखण करत होते. या तक्रारीचा डाॅ. गाजरे यांनी पाठपुरावा सुरूच ठेवल्यावर गवाणकर, हिंदुराव यांनी माणेरे येथील साई क्लिनिक दवाखान्यात कुमावत नावाचे डाॅक्टर आढळले. त्यांना पुन्हा रुग्ण सेवा करणार नाही, अशी हमी पालिका अधिकाऱ्यांना दिली.
या हमीनंतरही साई क्लिनिक दवाखान्यात डाॅ. कुमावत हे डाॅक्टर साहाय्यक म्हणून काम करत होते. तर कधी डाॅ. पिलारे रुग्ण सेवा देत असल्याचे पालिकेने केलेल्या तपासणीत दिसून आले. डाॅ. कुमावत हेच साई क्लिनिकमध्ये रुग्ण सेवा देत आहेत याच्या दृश्यध्वनी चित्रफिती तक्रारदार डाॅ. राकेश गाजरे यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाकडे दिल्या. पालिकेने केलेल्या चौकशीत साई क्लिनिकमध्ये डाॅ. रोहरा, डाॅ. भाकरे, डाॅ. पिलारे, डाॅ. कुमावत रुग्ण सेवा करत असल्याचे स्पष्ट झाले. ते रुग्णांच्या जीवशी खेळत आहेत, अशी भूमिका घेत या डाॅक्टरांवर कारवाई करण्याची मागणी डाॅ. गाजरे सतत पालिकेच्या आरोग्य विभागाकडे करत होते.
कडोंमपाचे आरोग्य कर्मचारी माणेरे येथील साई क्लिनिकमध्ये डाॅ. कुमावत आढळले नाहीत. बाहेरील डाॅक्टरांचा नामफलक बदलला आहे. याठिकाणी डाॅक्टर सतत बदलत राहिले आहेत. अशी उलटसुलट उत्तरे तक्रारदार गाजरे यांना देऊन त्यांची दिशाभूल करत होते. पालिका डाॅक्टरांची पाठराखण करत असल्याचे आणि त्यांच्यावर कारवाई करत नसल्याने डाॅ. गाजरे यांनी उल्हासनगर न्यायालयात या चार डाॅक्टरांवर कारवाई करण्यासाठी दावा दाखल केला. न्यायालयाने विठ्ठलवाडी पोलिसांना याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. उपनिरीक्षक महेंद्र सपकाळे यांनी याप्रकरणाची चौकशी करून न्यायालयाला अहवाल दिला. न्यायालयाने अहवालाच्या अनुषंगाने चारही डाॅक्टरांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. डाॅ. गाजरे यांनी मागील काही वर्षात वैद्यकीय प्रमाणपत्र नसलेल्या डाॅक्टरांवर कारवाई करण्यास उल्हासनगर, कल्याण डोंबिवली पालिकेला भाग पाडले आहे.