scorecardresearch

शहापूरमध्ये वीज चोरट्यांवर गुन्हे दाखल

शहापूर तालुक्यातील वासिंद, खर्डी व कसारा परिसरातील शंभराहून अधिक ग्राहकांनी तब्बल २० लाखांची एक लाख युनिट वीज चोरी केली असल्याचे उघडकीस आले आहे.

electricity thieves in Shahapur
शहापूरमध्ये वीज चोरट्यांवर गुन्हे दाखल (प्रातिनिधिक छायाचित्र)

ठाणे : वीजचोरी करणाऱ्यांना महावितरणच्या अधिकाऱ्यांनी महिनाभरापूर्वी शॉक देऊनही त्यांना झटका न बसल्याने अखेर या वीज चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शहापूर तालुक्यातील वासिंद, खर्डी व कसारा परिसरातील शंभराहून अधिक ग्राहकांनी तब्बल २० लाखांची एक लाख युनिट वीज चोरी केली असल्याचे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या धाडसत्रात उघडकीस आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा – ठाण्यात राष्ट्रवादी पक्ष फुटीच्या चर्चेला जोर, माजी नगरसेवकांनी घेतली खासदार श्रीकांत शिंदेंची वाढदिवसानिमित्त भेट

वीजचोरी करणाऱ्यांवर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची धाडसत्र मोहीम सुरू असून जानेवारी महिन्यात तालुक्यातील आसनगाव, कसारा, खर्डी, वासिंद परिसरातील पाटोळ, शिरोळ, अंबर्जे, बलवंडी, बेलवड, बेंडेकोन येथील १०० हून अधिक ग्राहकांनी वीज चोरी केल्याचे उघडकीस आले होते. या वीज चोरांनी तब्बल २० लाखांची एक लाख युनिटची वीज चोरी केली असून, त्यांना संबंधित रक्कम भरण्याची १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र दिलेल्या मुदतीत वीज देयके न भरल्याने या वीज चोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे शहापूरचे वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांनी सांगितले.

हेही वाचा – “पुण्यातील पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील,” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, मलंग गडावर केली महाआरती

वासिंद, खर्डी, कसारा शहापूर येथील अविनाश कटकवार यांसह संबंधित कनिष्ठ अभियंता, कर्मचारी, लाईनमन आदी या मोहिमेत सहभागी झाले होते. दरम्यान, वीज ग्राहकांनी महावितरणकडून अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 19:31 IST