scorecardresearch

“पुण्यातील पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील,” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, मलंग गडावर केली महाआरती

सामान्यांना न्याय देणारे विकासाभिमुख सरकार राज्यात आहे. विकासाचे, रखडलेले अनेक प्रकल्प मार्गी लावले जात आहेत. सहा महिन्यांत सामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Pune by elections Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

कल्याण – देशात पायाभूत सुविधा प्रकल्प राबविण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी रविवारी कल्याण येथे केले. “पुण्यातील पोटनिवडणूक बिनविरोध होईल यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत”, असे ते म्हणाले.

‘हिंदूंची वहिवाट हीच मलंग मुक्तीची पहाट’ या शिवसेनाप्रमुखांच्या आवाहनानंतर अनेक वर्ष जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांनी मलंग गड आंदोलनाचे नेतृत्व केले. त्यांच्या निधनानंतर या आंदोलनाचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे हे रविवारी मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच मलंगगडावर आले आणि मच्छिंद्रनाथांचे दर्शन घेऊन ते महाआरती सोहळ्यात सहभागी झाले. ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्याच्या विविध भागांतून शिवसैनिक गडावर सकाळीच दाखल झाले होते. आनंद दिघे यांनी सुरुवात केलेला हा उत्सव यापुढेही उत्साहाने साजरा केला जाईल. मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच गडावर येण्याचे भाग्य लाभले, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितले.

हेही वाचा – “माझ्या मते उत्तम मिसळ…” अभिषेक बच्चनने ‘या’ ठिकाणाचा उल्लेख करत केला खुलासा

सामान्यांना न्याय देणारे विकासाभिमुख सरकार राज्यात आहे. विकासाचे, रखडलेले अनेक प्रकल्प मार्गी लावले जात आहेत. सहा महिन्यांत सामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. महासाथीमुळे दोन वर्षे सर्व व्यवहार ठप्प होते. मात्र, आमचे सरकार आल्यावर प्रतिबंध लागलेले सर्व सण, उत्सव जोमाने साजरे करण्याचा निर्णय घेतला, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. सामान्यांचे जीवनमान उंचावेल असे प्रयत्न सुरू आहेत. देशात पायाभूत सुविधा प्रकल्प राबविण्यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्रिमंडळातील सहकारी विकासात योगदान देण्याचे काम करत आहेत, असे ते म्हणाले. पुण्यातील पोटनिवडणूक बिनविरोध होईल यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

माघी पौर्णिमेनिमित्त मलंग गडावर धार्मिक कार्यक्रम असतात. पाच दिवस याठिकाणी जत्रा भरते. राज्याच्या विविध भागातून हिंदू, मुस्लीम भाविक मोठ्या संख्येने श्रद्धेने गडावर येतात. विश्व हिंदू परिषद, हिंदू संघ, बजरंग दल अशा अनेक हिंदू संघटना मलंग गडावर उत्सव साजरा करण्यात पुढाकार घेतात. मागील ४० वर्षांपासून शिवसेनाप्रमुखांच्या आदेशानंतर मलंग गड मुक्तीसाठी शिवसैनिकांकडून आंदोलन केले जाते. अनुचित प्रकार टाळण्यासाठी गडाच्या पायथ्यापासून ते धर्मस्थळापर्यंत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस अधिकारी गडावर, पायथ्याशी उपस्थित होते. हेलिकाॅप्टरमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गडाच्या पायथ्याशी आगमन झाले. कल्याण, डोंबिवली, मलंग वाडी परिसरातील शिवसैनिकांनी त्यांचे स्वागत केले.

हेही वाचा – ठाण्यात राष्ट्रवादी पक्ष फुटीच्या चर्चेला जोर, माजी नगरसेवकांनी घेतली खासदार श्रीकांत शिंदेंची वाढदिवसानिमित्त भेट

परिवहनची बससेवा

कल्याण डोंबिवली पालिका परिवहन विभागातर्फे कल्याण ते मलंगगड विशेष बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी बस थांब्यावर पाण्याची, निवाऱ्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे परिवहन आगार व्यवस्थापक संदीप भोसले यांनी सांगितले.

फोटो ओळ

कल्याण जवळील मलंग गडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धार्मिक स्थळाच्या ठिकाणी महाआरती करण्यात आली. शिवसैनिक अधिक संख्येने उपस्थित होते.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 18:29 IST