thane railway station : ठाणे : ठाण्यात सोमवारी सुरु असलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतुक सुमारे १५ मिनीटे उशीराने होती. त्यामुळे ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा सह सर्वच महत्त्वाच्या स्थानकांत प्रवाशांची गर्दी उसळली. या गर्दीमुळे अनेकांना वेळेत रेल्वेगाडी उपलब्ध होऊ शकली नाही. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक चार आणि पाचवरील दोन सरकते जीने बंद होते. त्यामुळे ठाणे स्थानकातून प्रवास करणाऱ्या वयोवृद्ध, बालकांना त्रास सहन करावा लागला. नोकरदारांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही.

ठाणे शहरात सोमवारी पहाटेपासून कोसळणाऱ्या पावसाचा फटका थेट रेल्वे प्रवाशांना बसला. मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल १५ ते २० मिनिटे उशीराने सुरू असल्याने ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आदी महत्त्वाच्या स्थानकांवर प्रचंड गर्दी उसळली. गर्दी इतकी वाढली की अनेक प्रवाशांना वेळेत रेल्वे पकडता आली नाही. परिणामी, हजारो नोकरदारांना कार्यालयात उशिरा पोहोचावे लागले. त्यातच ठाणे स्थानकावरील फलाट क्रमांक चार आणि पाचवरील दोन सरकते जीने बंद पडले होते. त्यामुळे प्रवाशांना जीन्यांचा वापर करावा लागला.

वयोवृद्ध, महिला, लहान मुले व अपंग प्रवाशांसाठी हा प्रवास अक्षरशः त्रासदायक ठरला. ठाणे रेल्वे स्थानकात गर्दीमुळे प्रवाशांमध्ये काही वादाचे प्रसंगही उद्भवत होते. महिला प्रवाशांना रेल्वेगाडीत चढताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. पाऊस आणि त्यात रेल्वे वाहतुक उशीराने या दोन्ही संकटामुळे प्रवाशांमध्ये नाराजीची भावना होती. पावसाचा जोर वाढल्यास रेल्वे सेवेवर आणखी परिणाम झाल्यास नोकरदारांसमोर घरी परतण्याचे संकट येण्याची शक्यता आहे.