डोंबिवली – डोंबिवली जवळील गोळवली गाव हद्दीतील रिजन्सी अनंतम या गृहसंकुलात ठराविक रिक्षा चालकांची मागील काही महिन्यांपासून दादागिरी सुरू आहे. रिक्षा चालक सांगेल तेवढे भाडे द्यायचे आणि तो सांगेल तेवढ्याच प्रवाशांनी रिक्षेत बसायचे. शेअर रिक्षा पध्दतीने येथील प्रवाशांना प्रवास करू द्यायचा नाही. बाहेरील रिक्षा चालकांना गृहसंकुलात येऊन द्यायचे नाही. या दररोजच्या त्रासाने प्रवासी त्रस्त झाले आहेत.
या रिक्षा चालकांबरोबर प्रवासी भाडे आणि त्यांच्या दादागिरीवरून त्यांना जाब विचारला तर त्यांच्याकडून जीवाला धोका निर्माण होण्याची किंवा वाटेत एकटा असताना त्रास दिला जाण्याची भीती रिजन्सी अनंतम गृहसंकुलातील रहिवाशांना वाटते. त्यामुळे या मनमानी, अरेरावी करणाऱ्या रिक्षा चालकांविरुध्द कोणीही रहिवासी उघडपणे बोलण्यास तयार नाही. यापूर्वी काही रहिवाशांनी या रिक्षा चालकांना रिजन्सी अनंतम गृहसंकुल आवारात मनमानी करायची नाही. उपप्रादेशिक परिवहन विभागाने निश्चित केलेले भाडेच आकारायचे असे सुचविले होते. त्या रहिवाशाला या रिक्षा चालकांनी यापूर्वी अरेरावी करून गप्प केले होते.
रिजन्सी अनंतम गृहसंकुलात उच्च मध्यवर्गिय नोकरदार, उद्योजक, व्यावसायिक अधिक संख्येने राहतात. या सोसायटीच्या प्रवेशद्वारावर रिक्षा चालक रिक्षा उभ्या करतात. सोसायटीची प्रवासी वाहतूक बस आवारात आली तर बसला वळण घेऊन देण्यास जागा देत नाहीत. रिजन्सी अनंतम गृहसंकुलातील रहिवासी डोंबिवली रेल्वे स्थानक भागात जात असेल तर एकावेळी एकाच प्रवाशाला अधिकच्या भाड्याच्या आमिषाने रिक्षेत घेतले जाते. या प्रवाशाकडून ८० ते १०० रूपये भाडे उकळले जाते.
सकाळच्या वेळेत प्रवाशांची डोंबिवली रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी घाई असते. काही प्रवासी एकत्रितपणे रेल्वे स्थानकापर्यंतचा शेअर भाड्याने प्रवास करू म्हणून रिक्षा चालकाकडे विचारणा करतात. अशा प्रवासाला रिक्षा चालक विरोध करतात, अशा तक्रारी रिजन्सी गृहसंकुलातील रहिवाशांनी केल्या.
सकाळच्या वेळेत अनेक शाळकरी मुले एमआ़यडीसी, डोंबिवली, कल्याण परिसरातील शाळांमध्ये पालकांसोबत जातात. रिजन्सी अनंतम ते एमआयडीसी अंतर एक ते दोन किलोमीटर असुनही रिक्षा चालक मनमानी करून अशा पालकांकडून ७० ते ८० रूपये भाडे वसूल करतात. बाहेरील कोणीही रिक्षा चालक रिजन्सी अनंतम गृहसंकुलात प्रवासी घेऊन आला की त्याला तेथून तात्काळ स्थानिक रिक्षा चालक हाकलून लावतात.
बाहेरील रिक्षा चालकाला रिजन्सी अनंतममधील प्रवाशांची वाहतूक करण्यास स्थानिक रिक्षा चालक विरोध करतात. त्यामुळे रिजन्सी अनंतमच्या प्रवेशव्दारावर ठाण मांडून असलेल्या आणि प्रवाशांना प्रवासी वाहतुकीसाठी साहाय्य करण्याऐवजी त्यांना प्रवासी भाडे, प्रवासावरून त्रास देणाऱ्या रिक्षा चालकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी रिजन्सी अनंतम गृहसंकुलातील रहिवाशांनी उपप्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक विभागाकडे केली आहे.
रिजन्सी अनंतम गृहसंकुलात काही रिक्षा चालक मनमानी करून प्रवासी वाहतुकीपेक्षा तेथील रहिवाशांना प्रवासी वाहतूक, भाडे आकारणी वरून त्रास देत असतील तर संबंधितांवर आरटीओचे पथक पाठवून तात्काळ कठोर कारवाई केली जाईल. , आशुतोष बारकुल, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण.
