लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : टिटवाळा ते हेदुटणे या कल्याण-डोंबिवली बाह्यवळण रस्त्यातील मोठागाव ते दुर्गाडी किल्ला या सात किमी टप्यातील भूसंपादनाचे आव्हान कडोंमपा प्रशासनासमोर आहे. पालिका प्रशासन या मार्गाचे १०० टक्के भूसंपादन करून ताबा देत नाही, तोवर कामाला सुरुवात करण्यास ‘एमएमआरडीए’ने नकार दिला आहे.

या मार्गात बाधित शेतकऱ्यांची ८७ टक्के जमीन ताबा पावती, सात बारा उतारे आणि इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. ६४ टक्के जमीन ताब्यात आली आहे. टिटवाळा ते दुर्गाडी या १२ किमी लांबीच्या टप्प्यातील वळण रस्त्याची बहुतांशी कामे पूर्ण झाली आहेत. आंबिवली, अटाळी भागात काही चाळी या रस्ते मार्गात आहेत. त्या हटविण्याचे, तेथील रहिवाशांचे पुनर्वसन करायचे आहे. पाच वर्षे उलटूनही अटाळी भागातील अतिक्रमणे तशीच कायम आहेत. महालेखापालांच्या अहवालात या रखडलेल्या रस्ते कामावरून ताशेरे ओढण्यात आले आहेत. हा अनुभव गाठीशी ‘ असल्याने एमएमआरडीडए’च्या अधिकाऱ्यांनी दुर्गाडी किल्ला ते मोठागाव रस्ता सुरू करण्यापूर्वी मार्गातील १०० टक्के भूसंपादन करून या जमिनीच्या ताबा पावती, सातबारा उतारा ताब्यात देण्याची मागणी केली आहे. महानगर आयुक्त डॉ. संजय मखर्जी यांनी संपूर्ण भूसंपादन झाले की तातडीने हे काम हाती घेतले जाईल, असे सांगितल्याचे पालिका अधिकारी म्हणाले.

आणखी वाचा- अतीसंवेदनशील पडघा पुन्हा चर्चेत, NIA ची भिवंडीतही कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कडोंमपा आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनीही वळणरस्ता प्राधान्याने मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. यापूर्वीच्या नगररचना अधिकाऱ्यांनी वळण रस्ते मार्गाच्या भूसंपादनाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे आयरे, कोपर, भोपर, काटई, कोळे, हेदुटणे भागातील वळण रस्त्याची मोजणी होऊ शकली नाही. यासंदर्भात प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता व्ही. ए. जांभळे यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.