कल्याण : कल्याण पूर्वेतील चक्कीनाका भागातील एका बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या प्रकरणातील आरोपींवर येत्या आठवडाभरात आरोपपत्र दाखल केले जाईल. हा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल यादृष्टीने तपास पूर्ण करण्यात आला आहे, अशी माहिती कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी माध्यमांना दिली.

बालिका हत्येमधील आरोपी विशाल गवळी, पत्नी साक्षी तुरूंगात आहेत. नव्वद दिवस उलटून गेले तरी याप्रकरणाचे आरोपपत्र न्यायालयात दाखल न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याविषयी उपायुक्त झेंडे यांनी सांगितले, या गुन्हे प्रकरणात तपासात कोणत्याही प्रकारच्या त्रृटी राहू नयेत याची काळजी घेतली गेली जात आहे. या गुन्ह्याचा परिपूर्ण तपास व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. आरोपींना तपासातील कोणत्याही त्रृटीचा गैरफायदा मिळू याची काटेकोर काळजी घेतली आहे. याप्रकरणा संदर्भात ज्येष्ठ सरकारी वकील ॲड. उज्जवल निकम यांच्याशी चर्चा करण्यात येत आहे. आरोपपत्र दाखल करण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्याची कार्यवाही सुरू आहे. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर येत्या आठवड्यात आरोपींवर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले जाणार आहे.

हा खटला जलदगती न्यायालयात विना विलंब चालविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. पीडित कुटुंबीयांना तीन तरूणांनी धमकविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तिघांना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. पीडित कुटुंंबीयांना कोणाचाही त्रास होऊ नये म्हणून त्यांच्या घराबाहेर एक महिला, पुरूष पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती उपायुक्त झेंडे यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कदम यांची बदली

कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांची प्रशासकीय हलगर्जीपणामुळे बदली करण्यात आली आहे. तेथील वरिष्ठ पदावर अद्याप कोणाचीही नव्याने नियुक्ती झाली नाही, असे उपायुक्त झेंडे यांनी सांगितले. कदम यांना कल्याण येथील नियंत्रण कक्षात पाठविण्यात आले आहे. कल्याण पूर्वेत पीडित कुटुंबीयांच्या घरासमोर तीन जणांनी दहशत पसरवली. तसेच या कुटुंबीयांनी पोलीस संरक्षण मागवुनही ते दिली नाही. या कारणास्तव कदम यांची बदली झाल्याची पोलीस दलात चर्चा आहे.