कल्याण : छट पूजेनिमित्त कल्याण जवळील रायते भागात उल्हास नदी काठी उत्सव साजरा करण्यासाठी आलेल्या कुटुंबांमधील दोन मुले सोमवारी संध्याकाळी पाय घसरून उल्हास नदीत पडली. पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. या दोन्ही मुलांचे मृतदेह बुधवारी सकाळी कल्याण पडघा रस्त्यावरील गंधारे नदी पुलाजवळ आणि एक मृतदेह रायता भागात नदी पात्रात आढळून आले.कल्याण डोंबिवली पालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही बुडालेल्या मुलांचा शोध दोन दिवसांपासून घेत होते. उल्हास नदीच्या पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे या मुलांचा शोध घेण्यात अग्निशमन जवानांना अडथळे येत होते. प्रिन्स गुप्ता (१६), राजन विश्वकर्मा (१८) अशी या दोन मृत मुलांची नावे आहेत.
कल्याण, डोंबिवली शहर परिसरातील अनेक परप्रांतीय भाविक आपल्या कुटुंबीयांसह घर परिसरातील खाडी, नदी परिसरात छटपूजेसाठी सोमवारी संंध्याकाळी आले होते. पाच ते सहा कुटुंब याठिकाणी छट पूजा करत होती. छट पूजेचा विधी सुरू असताना या कुटुंबीयांमधील दोन मुले कुटुंबीयांची नजर चुकवून नदी काठच्या दलदलीत फिरत होती. यामधील एका मुलाचा पाय घसरून तो नदीत पडला. त्याला वाचविण्यासाठी दुसरा पुढे गेला म्हणून तोही नदीत पडला. खोल पात्र आणि वेगवान प्रवाहामुळे हे दोघेही वाहून गेले.
नदीत दोन मुले बुडाली असल्याचे नदी किनाऱ्यावरील काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ ओरडा करून दोन मुले नदी पात्रात बुडाली असल्याचे जाहीर केले. त्यावेळी प्रत्येक कुटुंब आपली मुले कोठे आहेत याचा शोध घेऊ लागली. एका कुटुंबाला आपली मुले आपल्याजवळ आणि परिसरात नसल्याचे लक्षात आले. ती कोठेच आढळून आली नाहीत. त्यामुळे आपली मुले बुडाली असल्याचे दोन कुटुंंबांच्या निदर्शनास आले.
टिटवाळा पोलीस, कल्याण डोंबिवली पालिकेचे अग्निशमन जवान तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी रात्री उशिरापर्यंत मुलांचा शोध घेतला. ती आढळून आली नाहीत. मंगळवारी दिवसभर जवानांंनी रायते नदी परिसर, लगतची झुडपे यांच्यामध्ये मुलांचा शोध घेतला. ती आढळली नाहीत. एका मुलाचा मृतदेह बुधवारी सकाळी गंधारे नदी पात्राजवळ तरंगत असल्याची माहिती अग्निशमन विभागाला समजली. तातडीने पथक तेथे पोहचले. त्यावेळी तो रायते येथे बुडालेला मुलगा असल्याचे समजले. दुसरा मुलगा रायते भागात झुडपाच्या आडोशाला मृत अवस्थेत आढळला. हे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.
