बदलापूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मागे पडला आणि तुमच्या प्रभागात जर आपल्या उमेदवाराला कमी मते मिळाली तर लक्षात ठेवा पालिका निवडणुका तोंडावर आहेत. तुम्हाला तिकीटाला मुकावं लागेल, अशी स्पष्ट कान उघाडणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बदलापुरात महायुतीच्या मेळाव्यात केली. भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्या प्रचारासाठी शिंदे बदलापुरात आले होते. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी कथोरे यांच्याविरुद्ध प्रचार सुरू केल्याची चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी कडक शब्दात सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना सुनावले. तुम्ही वामन म्हात्रे यांची कळ काढली असेल तर दुरुस्त करा. तुमच्यातील वाद स्थानिक पातळीवर मिटवा आणि राज्याचा विचार करून महायुतीचा उमेदवार जिंकवा असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

मुरबाड विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांना महायुतीतील घटक पक्षांचा सामना करावा लागत असल्याचे चित्र मुरबाडमध्ये होते. शिवसेनेचे बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी कथोरे यांच्याविरुद्ध जाहीर आघाडी उघडली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आमदार किसन कथोरे यांच्यासाठी बदलापुरात महायुतीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी बोलताना शिंदे यांनी आमदार किसन कथोरे यांच्यासह वामन म्हात्रे आणि महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची कान उघाडणी केली. आपण महायुतीमध्ये काम करत आहोत. असे असताना आपापसातील मतभेद मिटवा. कथोरे आपण म्हात्रे यांची काही कळ काढली असेल तर ती तात्काळ दुरुस्त करा. शिवसेनेच्या तसेच महायुतीतील सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी पदाधिकाऱ्यांनी सोबत काम करा, अशा सूचना शिंदे यांनी यावेळी केल्या. ज्या प्रभागात कथोरे यांना कमी मतं मिळतील, त्या प्रभागातील नगरसेवकाचे पालिका निवडणुकीचे तिकीट कापले जाईल असाही स्पष्ट इशारा यावेळी शिंदे यांनी बोलताना दिला. शिवसेनेच्याच नाही तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संभाव्य उमेदवारांचे तिकीटही कापले जाईल असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. यासोबतच वामन म्हात्रे याच्या केसालाही धक्का लागणार नाही असे वक्तव्य करत म्हात्रे यांना अडचणीत आणणाऱ्यांना शिंदे यांनी इशारा दिला. या समेट भाषणानंतर महायुतीचे आणि विशेषतः शिवसेनेचे पदाधिकारी अखेरच्या टप्प्यात प्रचारात सक्रिय होतील अशी आशा भाजप पदाधिकाऱ्यांना आहे.

हे ही वाचा… दिघे साहेबांची प्रतिमा फाडण्याचे धाडस होते कसे ? केदार दिघे यांचा सवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बेईमानी खपून घेणार नाही

तुम्हाला आम्ही मोठे केलं, तुम्हाला सत्ता दिली, तुम्हाला जिल्हा परिषदेचा कारभार दिला असे असताना पण तुम्ही बेइमानी केली. हा एकनाथ शिंदे ही बेइमानी खपवून घेणार नाही, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार सुभाष पवार यांचा समाचार घेतला. पवार हे शिवसेनेचे उपजिल्हा संपर्कप्रमुख आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. विधानसभेच्या तिकिटासाठी त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाट धरली होती.